आग्रीपाडा येथील एका फ्लॅटमधील नशेची प्रयोगशाळा उघडकीस आल्याचे प्रकरण ताजे असतानाच, साकीनाका पोलिसांनी आता गुजरातमधील एका घरात सुरू असलेला ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. भाड्याने घर घेऊन एमडी ड्रग्ज तयार करून त्याची विक्री मुंबईत केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणात एका महिलेसह दोघांना अटक केली असून, गुजरातमधील घरातून द्रवस्वरूपातील एमडी आणि ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा सुमारे ७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
साकीनाका पोलिसांनी २१ मे रोजी अंधेरी घाटकोपर-लिंक रोडवर ड्रग्जविक्रीसाठी आलेल्या मुस्कान खान (२६) या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे १०१ ग्रॅम एमडी सापडल्याने गुन्हा दाखल करून तिला अटक केली. मुस्कानने हे ड्रग्ज मुंब्रा येथील वझुल चौधरी ऊर्फ पप्पू (५६) याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी वझुल याला शिळफाटा येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली. वझुलने तो स्वतःच एमडी ड्रग्ज बनवत असल्याचे सांगितले.
गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील वरखड येथे ओळखीच्या व्यक्तीचे घर भाड्याने घेऊन त्यामध्ये एमडीची निर्मिती करीत असल्याची माहिती त्याने दिली. साकीनाका पोलिसांनी गुजरातमधील या घरामध्ये छापा टाकला. या घरामध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी एक युनिट उभारण्यात आले होते. पोलिसांनी वेगवेगळी केमिकल, द्रव स्वरूपातील एमडी ड्रग्ज, इतर साहित्य असा सुमारे ७४ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
कॅबच्या आडून ड्रग्जविक्री
मुस्कान ही कॅब चालवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. कोणालाही संशय येऊ नये यासाठी मुस्कान कॅब चालवण्याच्या बहाण्याने ड्रग्जविक्री करीत होती. या आडून रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे, याबाबत चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तेलंगणातील ड्रग्ज कारखान्यावर छापा
मिरा-भाईंदरमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी तेलंगणातील एका फार्महाऊसमध्ये सुरू असलेल्या अमली पदार्थ निर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकला. मिरा-भाईंदर गुन्हे शाखा ४च्या पथकाने केलेल्या या कारवाईत २० कोटी रुपयांहून अधिक किमतीचे एमडी तयार करण्याचे साहित्य जप्त केले. मिरा रोडच्या नयानगर भागातील एक घरावर मागील महिन्यात गुन्हे शाखेने छापा टाकून अडीच कोटींहून अधिक किंमतीचा एमडी हा अमली पदार्थ जप्त केला होता. एमडी बाळगणाऱ्या फिरदोस आणि अरबाज या जोडप्याला अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशी आणखी काही जणांचा हभाग आढळल्याने १५ जणांना अटक करण्यात आली होती
यापूर्वी मुंबईतील मालवणीसह अन्य भागांतून एमडी तयार करण्यासाठी लागणारे सुमारे १३ कोटी रुपये किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान एमडी निर्मितीच्या रॅकेटमध्ये आणखी काही जण सक्रिय असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी खालापूर येथून संदीप नायडू, बाबा शेख आणि मेहमूद खान यांना अटक केली. त्यांच्या चौकशीत तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पिचारगंडी गावात अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती उघड झाली.
देशभरात एमडी पुरवल्याचा अंदाज
या माहितीआधारे पोलिसांनी तेलंगणातील कारखान्यावर छापा टाकला आणि तीन किलो तयार एमडी आणि सुमारे सहा कोटी रुपये किमतीचे केमिकल तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारखान्यात तयार होणारा अमली पदार्थ देशातील विविध राज्यांमध्ये पुरवला जात असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती मिरा-भाईंदर वसई-विरारचे पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी दिली.
