दोघांनी अर्ज घेतले, पण भरला एकानेही नाही; नाशकात ठाकरेंची माघार, शिंदेंना ‘बाय’ दिल्याची चर्चा

निवडणूक लढण्यासाठी महायुतीत शेवटच्या क्षणापर्यंत रस्सीखेच सुरू असताना महाविकास आघाडीने घेतलेला ‘यू टर्न’ चर्चेचा विषय ठरला आहे. ‘मविआ’त शिवसेना ‘उबाठा’तर्फे माजी आमदार वसंत गिते, अनिल कदम यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने या दोघांपैकी एक निवडणूक रिंगणात उतरेल अशी चर्चा होती. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करत शिवसेना ‘उबाठा’ नेत्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ठाकरेंच्या माघारीने आश्चर्य

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडे ७० च्या आसपास मतदार असतानाही आणि एकट्या शिवसेना ‘उबाठा’ कडे ५२ मतदार असतानाही शिवसेना ‘उबाठा’ पक्षाने निवडणुकीतून माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या निवडणुकीत होणारा घोडेबाजार मान्य नसल्याचा दावा करत पापात वाटेकरी व्हायचे नाही, म्हणून उमेदवार दिला नसल्याचे स्पष्टीकरण ‘उबाठा’चे जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी दिले. अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता मिर्लेकर यांनी फेटाळली असली तरी या भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाला ‘बाय’ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी नाशिकच्या जागेबाबत संपर्क केला नसल्याचेही स्पष्टीकरण रवींद्र मिर्लेकर यांनी दिल्याने ‘मविआ’तही आलबेल नसल्याचे चित्र आहे. उमेदवारीबाबत महाविकास आघाडीतील कोणत्याही घटक पक्षाने आमच्याशी संर्पक करून निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली नाही, आघाडीतील अन्य घटक पक्षांचा उमेदवार असता तर आम्ही त्यास पाठिंबा दिला असता, असे मिर्लेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *