युद्धाच्या छायेत परदेश प्रवासाला ब्रेक, मार्च-एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासीसंख्येत घट

सुट्यांच्या हंगामात परदेश पर्यटनाला मोठी पसंती मिळते. मात्र यंदा मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्यांत भारतातून परदेशात जाणाऱ्या प्रवासीसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती, हवाई क्षेत्रावरील निर्बंध आणि प्रवाशांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना यांचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर झाला आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) आकडेवारीतून हा कल स्पष्ट झाला असून पर्यटन व्यावसायिकांच्या मते मे महिन्यातही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

आकडेवारीनुसार, २०२५च्या मार्च महिन्यात भारतातून १८ हजार ५०२ आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणे झाली होती. यावर्षी मार्चमध्ये हा आकडा ११ हजार २८४ वर आला. एप्रिल २०२५मध्ये १८ हजार ३२३ आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली होती, तर यंदा एप्रिलमध्ये ती केवळ ११ हजार ५०८ इतकी राहिली. म्हणजेच एप्रिलमध्ये या संख्येत सुमारे ३७ टक्क्यांची घट झाली आहे.

प्रवासीसंख्येतही याच काळात मोठी घसरण दिसून आली. मार्च २०२५मध्ये २९ लाखांहून अधिक प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. त्याच्या तुलनेत यंदाच्या मार्चमध्ये हा आकडा १८ लाख ४४ हजार ९७६ इतका राहिला. एप्रिल २०२५मध्ये ३० लाखांहून अधिक प्रवासी परदेशात गेले होते, तर यंदा एप्रिलमध्ये केवळ १८ लाख २४ हजार ९३६ प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ लाख ८२ हजारांहून अधिक प्रवासी कमी झाले. यंदाच्या जानेवारीत ३३ लाखांहून अधिक आणि फेब्रुवारीत २८ लाखांहून अधिक प्रवाशांनी परदेश प्रवास केला होता.

पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, परदेशपर्यटन ही गरज नसून आनंदाचा भाग असते. त्यामुळे आनंदासाठी पर्यटनाचा विचार केलेल्या अनेकांनी यंदा प्रवास पुढे ढकलला किंवा रद्द केला.

देशांतर्गत प्रवासातही मर्यादित घट

आंतरराष्ट्रीय पर्यटनात घट झाल्याने हे प्रवासी देशांतर्गत पर्यटनाकडे वळतील, असा अंदाज होता. मात्र देशांतर्गत हवाई वाहतुकीच्या आकडेवारीत त्याचे ठोस प्रतिबिंब दिसत नाही. देशांतर्गत प्रवासीसंख्येत दोन महिन्यांमध्ये काहीशी घट झाली असली, तरी ती आंतरराष्ट्रीय वाहतुकीइतकी तीव्र नाही. गेल्या वर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांत अनुक्रमे १ कोटी ४५ लाख आणि १ कोटी ४३ लाख प्रवाशांनी देशांतर्गत हवाई प्रवास केला होता. यंदा मार्चमध्ये हा आकडा १ कोटी ४३ लाख, तर एप्रिलमध्ये १ कोटी ३८ लाख इतका राहिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *