राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अर्जांच्या छाननीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला अपात्र ठरल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर ‘ही केवळ तांत्रिक अडचण असून, ती दूर करण्यात येईल. महिलांनी काळजी करू नये, अशी ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत ई-केवायसी आणि कागदपत्रांच्या कडक पडताळणीनंतर तब्बल ७० ते ८० लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरले. या मोठ्या छाननी प्रक्रियेनंतर राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची अंतिम संख्या १ कोटी ६६ लाखांवर आली आहे. या सर्व घडामोडींवर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिले.
‘मुख्यमंत्री घेणार योग्य निर्णय’
गिरीश महाजन म्हणाले की, ‘ज्या महिलांच्या अर्जांमध्ये तांत्रिक चुका आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घेतला जाईल.’
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
काही विरोधक हे केवळ ‘बोलबच्चन’ नेते आहेत. जनतेमध्ये त्याचा प्रभाव उरलेला नाही. निवडणुकीच्या भीतीने ते केवळ आरोप करत आहेत. मात्र, जनतेचा विश्वास सरकारवरच असल्याचे त्यांनी सांगितले.
‘अपात्र लाभार्थ्यांना पैसे वाटत होते का?’ : सुळे
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कमालीची घटलेली संख्या हा चिंतेचा विषय असून, नागरिकांच्या कष्टाच्या कररूपी पैशांतून ही योजना चालवली जाते. त्यामुळे गेली वर्ष-दीड वर्ष सरकार अपात्र लाभार्थ्यांनाच लोकांचा पैसा वाटत होते का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी केले.
