ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतमधील कोळसेवाडी परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका लहान मुलानं खरेदी केलेल्या एका कोन आईस्क्रीममध्ये तब्बल तीन इंच लांबीचा किडा आढळल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व येथील, रचना पार्क येथील एका दुकानातून शशांक जाधव नावाच्या मुलाने कोन आईस्क्रीम खरेदी केलं होतं. आईस्क्रीम खाण्यास सुरुवात करताच त्यामध्ये किडा असल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. हा प्रकार समोर येताच मुलाच्या कुटुंबियांनी संबंधित दुकान गाठून तीव्र संताप व्यक्त केला आणि याबाबत स्पष्टीकरण मागितलं. घटनास्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन दुकानदारानं संबंधित कंपनीच्या वितरकाला (डिस्ट्रीब्युटर) देखील घटनास्थळी बोलावलं. दुकानदाराने आपली बाजू मांडताना सांगितलं की, ‘या प्रकरणात त्याची कोणतीही चूक नाही. संबंधित आईस्क्रीमची एक्सपायरी डेट 2027 पर्यंत वैध असून ते कंपनीकडून सीलबंद अवस्थेत प्राप्त झालं होतं’. घरच्यांनी ते आईस्क्रीम जवळून पाहिले असता त्यात तब्बल लांब आणि जाड किळसवाणा असा किडा चिकटलेला होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आईस्क्रीमच्या पॅकेटवरील एक्सपायरी डेट ही 2027 पर्यंतची होती.
पुढे काय झालं?
मुलाच्या आईस्क्रीममध्ये हा प्रकार पाहून पालक प्रचंड घाबरले आणि त्यांनी तातडीने संबंधित दुकानदाराकडे धाव घेतली आणि त्याला जाब विचारला. त्यावर दुकानदाराने हात झटकला त्यानंतर कंपनीच्या वितरकाला बोलावलं मात्र, त्यानेही चूक मान्य करण्याऐवजी हात झटकून तेथून निघून गेला. दरम्यान, मुलाच्या कुटुंबियांनी संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पालकांमध्ये संताप
आईस्क्रीमबाबत असा प्रकार घडणे हा फक्त निष्काळजीपणा नाही तर लोकांच्या जीवाशी खेळणारा थेट गुन्हाच आहे, असा संताप मुलाच्या पालकांनी व्यक्त केलेला आहे. जर हा किडा नकळतपणे मुलाच्या पोटात गेला असता तर जीवाला धोकाही निर्माण झाला असता. मात्र, आता या आईस्क्रीम कंपनीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी ते करत आहेत.
