रेल्वे मार्गांखालून भुयारी मार्ग, देशातील पहिला ‘जलरोधक सबवे’ भिवंडीत; अपघातांची संख्या कमी होणार

मुंबई उपनगरी रेल्वे रुळांवरील मृत्यू रोखण्यासाठी पादचारी पुलांच्या पर्यायाला मर्यादा आल्यानंतर आता मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) सबवेवर लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्णपणे जलरोधक सबवे भिवंडीत उभारण्यात येत आहे. त्याची बांधणी करताना त्रिस्तरीय जलरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईत रुळांवरील जास्त अपघात होणाऱ्या ठिकाणी अशा भुयारी मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे.

नागरिकांकडून पादचारी पुलांकडे दुर्लक्ष

रेल्वे रुळांवरील मृत्यू रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ‘एमआरव्हीसी’ला अर्थपुरवठा केला जातो. महामुंबईत रेल्वे रूळ ओलांडताना सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३६ ठिकाणी महामंडळाकडून पादचारी पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, उंची अधिक असल्याने प्रवासी पुलाऐवजी जीव धोक्यात घालत रूळ ओलांडण्यास प्राधान्य देतात.

महामुंबईतील पनवेल-वसई मार्गावरील भिवंडी स्थानकात ‘ऑल वेदर सबवे’ उभारण्यात येत आहे. ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर’च्या (डीएफसी) दोन मार्ग, दोन मेल-एक्स्प्रेस आणि तीन लूप मार्गिका अशा सात मार्गिकांच्या खालून हा पूर्व-पश्चिम जोडणारा भुयारी मार्ग जाणार आहे. पादचारी पुलाची उंची साधारण ११ ते १२ मीटर उंच असते. भुयारी मार्ग जमिनीपासून चार ते पाच मीटर खाली बांधणे सहज शक्य आहे.

कसा बांधणार मार्ग?

भिवंडीचा सबवे ६८ मीटर लांब आहे. त्याच्या बांधकामासाठी ‘बॉक्स पुशिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. बॉक्सची जाडी ४०० मिमी आहे. रेल्वे वाहतूक सुरू असतानाही सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी रुळांखाली मजबूत लोखंडी गर्डर बसवण्यात येत आहेत. ‘कप अँड कोन’ पद्धतीच्या बॉक्स प्रणालीद्वारे भूमिगत संरचना जोडली जाणार आहे. बॉक्सच्या सांध्यांमध्ये रबर गॅस्केट बसवून पाणी झिरपण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सन २०२२ ते २०२५दरम्यान मध्य रेल्वेवर एकूण सहा हजार २२५ आणि पश्चिम रेल्वेवर तीन हजार ६२७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ‘एमयूटीपी ३’ प्रकल्पसंचाअंतर्गत रूळ ओलांडणीच्या संवेदनशील ठिकाणी उपाययोजना पूर्ण झाल्या आहेत. नव्याने निर्माण झालेल्या संवेदनशील ठिकाणांचा एकत्रित समावेश ‘एमयूटीपी ४’मध्ये करण्यात येणार आहे.

पाणी रोखण्यासाठी खबरदारी

पावसाळ्यात शहरातील अनेक सबवेमध्ये पाणी साचणे, ओलावा येणे अशा अडचणी येतात. त्यामुळे प्रवासी सबवेचा वापर करत नाहीत. ‘एमआरव्हीसी’च्या भिवंडी सबवेमध्ये अशा समस्या टाळण्यासाठी बॉक्सच्या सांध्यांवर रबर गॅस्केट, विशेष जलरोधक मिश्रण आणि अतिरिक्त संरक्षणात्मक थर लावण्यात येणार आहे. पावसाचे पाणी आत येऊ नये म्हणून सबवेच्या प्रवेशद्वारावर आणि बाहेर पडण्याच्या मार्गाची पातळी ६० सेंटीमीटरने उंच ठेवण्यात येणार आहे.

‘एमआरव्हीसी कडून भिवंडीत येणाऱ्या ‘ऑल वेदर सबवे’चे काम शेवटच्या टप्प्यात आहे. मान्सून सुरू होण्यापूर्वी हा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येईल. भुयारी मार्गाचा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतही याचा वापर करण्याचे नियोजन आहे. – विलास वाडेकर, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एमआरव्हीसी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *