सिडकोचा मोठा निर्णय, येत्या 28 मे पासून 10 टक्के पाणी कपात होणार

सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, मजीप्रा यांचे पाताळगंगा धरण यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून, तापमानवाढीमुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवनही वाढत आहे. त्याचबरोबर धरणांतील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, उपलब्ध पाणीसाठा धरण भरेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियंत्रित आणि काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. सदर सर्व स्रोतांतील उपलब्ध जलसाठा, प्राप्त होणारा दैनंदिन पाणी पुरवठा आणि स्थानिक पाणीवाटप यांचे सिडको प्रशासनामार्फत नियमित आढावा घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

सध्याच्या परिस्थितीचा सर्वांगीण विचार करून आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सिडको क्षेत्रात गुरुवार, 28 मे 2026 पासून 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेटवणे, मोरबे आणि इतर संबंधित जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांतील उपयुक्त जलसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत सदर पाणी कपात लागू राहील. अशाप्रकारचा पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी आपल्या क्षेत्राकरिता घेतला आहे.

पाणीपुरवठा बंद राहण्याचे सुधारित वेळापत्रक

अ. क्र. सिडको नोड / विभाग दि. 28/05/2026 पासून पाणीपुरवठा बंद राहण्याचा वार

  • १ खारघर – सोमवार
  • २ तळोजा – शुक्रवार
  • ३ कळंबोली व नावडे – बुधवार
  • ४ कामोठे – शुक्रवार
  • ५ नवीन पनवेल (पूर्व) – सोमवार
  • ६ नवीन पनवेल (पश्चिम) – मंगळवार
  • ७ करंजाडे – गुरुवार
  • ८ काळुंद्रे – शुक्रवार
  • ९ उलवे (सेक्टर-२, ३, ५, ६, १९, १९ए, २०, २१, २३, गव्हाण गाव व मोरावे गाव) – मंगळवार
  • १० उलवे (सेक्टर-८, ८ए , ९, १०बी, १६, १६ए, १५, १७, १८, २४, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी ) – शुक्रवार
  • ११ अ) उलवे (सेक्टर-२५ व २५ए ) ब) द्रोणागिरी – रविवार

वरील वेळापत्रकानुसार संबंधित नोड / विभागामध्ये पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यावर काही कालावधीसाठी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन पाणी वापरताना आवश्यक दक्षता घ्यावी, असं आवहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *