वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस, रिक्षा आणि अन्य वाहनांच्या वर्दळीमुळे येथील प्रवास कोंडीचा झाला आहे. हा प्रवास कोंडीमुक्त व्हावा आणि प्रवाशांना त्वरित रिक्षा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पश्चिमेकडील नियोजनाप्रमाणेच वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेलादेखील रिक्षांसाठी स्वतंत्र मार्गिका आणि स्टँड करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेने तयार केला आहे. एच पूर्व वॉर्डने हा प्रस्ताव महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर केला आहे.
पादचाऱ्यांना फायदा होणार
वांद्रे पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर येताच वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), म्हाडा, सरकारी वसाहत, भारतनगर आदी ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा मिळतात. मात्र, मीटर रिक्षा आणि शेअर रिक्षांसाठी स्वतंत्र मार्ग, स्टँड नाही. परिणामी, रेल्वे स्थानकाबाहेर प्रचंड गोंधळ असतो. वाहनांच्या वर्दळीमुळे रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना वाट काढणेही कठीण होते.
