गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या कामाला महापालिकेकडून वेग आला आहे. त्याअंतर्गत रविवारी ३१ मे रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुलुंडमधील खिंडीपाडा परिसरातील अमरनगर येथे मोठी कारवाई केली. या पाडकाम मोहिमेत सुमारे १५० अनधिकृत निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर हातोडा पडला आहे. ही कारवाई टी वॉर्डच्या अतिक्रमण तोडक पथकाने केली. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाच्या मार्गात येणारी अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गासाठी जागा उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रशासनाने काय सांगितले?
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडण्यात आलेली बांधकामे ही प्रकल्पाच्या निश्चित मार्गात येत होती. त्यामुळे ती हटवणे आवश्यक होते. या भागात अद्याप २३४ अनधिकृत बांधकामे शिल्लक आहेत. त्यांच्यावरही पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा लवकरच राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
