भामरागडमध्ये रानडुकराचा हल्ला; रुग्णवाहिका नाही, रस्त्याअभावी जखमींना कावडीतून दवाखान्यात नेण्याची वेळ

रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी चक्क बांबूच्या कावडीवरून डोंगरदऱ्या पार करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

दर्भा परिसरात गेल्या दोन दिवसांत रानडुकरामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच मुल्ला चैतू पिडसे (५०) हे जंगलात गेले असताना अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर गंभीर जखमा झाल्या. सोबत असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्याने रानडुकराने पळ काढला. मात्र, जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात नेणे आवश्यक होते. परंतु, दुर्गम भागात रस्ता नसल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी बांबूची कावड तयार करून जखमींना जवळपास एक किलोमीटर अंतर पायी चालत मुख्य रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, १ मे रोजी याच भागात मादी टुगे पुंगाटी (४५) या महिलेवरही रानडुकराने हल्ला केला. या घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींवर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

‘जखमींना तातडीने आर्थिक मदत द्या’
तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर जंगलात वावर वाढत असताना अशा हल्ल्यांची मालिका सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच जखमींना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. दुर्गम भागातील रस्त्यांच्या अभावामुळे नागरिकांना आजही अशा संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *