महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत ८० लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र ठरलेल्यांमध्ये प्रामुख्याने ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांची संख्या ६० लाख असल्याचे समजते. तसेच निकष पूर्ण न करणाऱ्या २० लाख महिलाही अपात्र ठरल्या आहेत.
२ कोटी ३१ लाख महिला पात्र
राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. त्यावेळी या योजनेत तब्बल २ कोटी ३१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. वय वर्षे ६५ पूर्ण केलेल्या महिलांनाही या योजनेतील लाभ मिळाला असून काही कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी, नमो शक्ती योजनेत लाभार्थी देखील आढळून आले होते. परिणामी राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतला होता. महिला व बालविकास विभागाने अपात्र ठरणाऱ्या महिलांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांना योजनेतून अपात्र ठरवले आहे. ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या आणि इतर निकषांची पूर्तता न करणाऱ्या महिलांची एकूण संख्या ८० लाख इतकी असल्याचे महिला व बालविकास विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्या प्रकरणांचीही चौकशी होणार
या योजनेतील अनेक पात्र लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, त्यानंतरही अनेकांना हप्ता मिळाला नसल्याची तक्रार महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाली आहे. या तक्रारींचीही पडताळणी सुरू असून याबाबतही चौकशी सुरू केल्याची माहिती महिला व बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या योजनेतून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि निवृत्तीवेतन धारकांना हप्त्याचे वाटप झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणीही महिला व बालविकास विभागाने वसुलीची मोहीम सुरू केली आहे.
सुप्रिया सुळेंचा घणाघात –‘लाडकी बहीण योजनेतून ८० लाख महिलांना अपात्र ठरविण्यात आले. निवडणूकीच्या काळात कसलीही खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे वर्ष दीड वर्षाने सरकारला या योजनेत ८० लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे. सरकारने महिलांचा विश्वासघात केला आहे’, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
