तपास होणारच नसेल तर, CID कार्यालयाला टाळे ठोका! दादांच्या अपघात प्रकरणावरुन रोहित पवार आक्रमक

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणात चार महिन्यांनंतरही राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) ठोस माहिती आणि तपासातील प्रगती अहवाल सादर केलेला नाही; त्यामुळे ‘तपास होणारच नसेल, तर ‘सीआयडी’च्या कार्यालयाला टाळे ठोका,’ अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी रोजी बारामती येथे विमान अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली होती. या अनुषंगाने ठोस कारवाई न झाल्याने रोहित पवार यांनी कुलूप घेऊन ‘सीआयडी’ कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ‘सीआयडी’वर टीकेची झोड उठवली. ‘विमान अपघात प्रकरण अत्यंत संवेदनशील असूनही ‘सीआयडी’कडून अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे.

‘राज्यातील महत्त्वाच्या नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला असून, त्यामागचे सत्य अद्याप बाहेर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास नेमका कोणत्या दिशेने सुरू असून, त्यामध्ये किती प्रगती झाली, याची माहिती जनतेला मिळायला हवी. मात्र, तपास यंत्रणा अकार्यक्षम असून, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कुलूप घेऊन आंदोलन केले,’ असे पवार म्हणाले.

‘तपास ‘सीबीआय’कडे द्या’
‘सीआयडी’मार्फत केल्या जाणाऱ्या तपासाबद्दल यापूर्वी शंका उपस्थित केली जात नव्हती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या तपासाची माहिती घेण्यासाठी चार महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत; त्यामुळे अजित पवार विमान अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा,’ अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

तपास योग्य दिशेने सुरू
अजित पवार विमान अपघात मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ‘सीआयडी’कडून विविध विभाग; तसेच संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. विविध यंत्रणांकडून तपासाच्या अनुषंगाने लागणारी माहिती आणि अहवाल मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे,’ अशी माहिती ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *