मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या डोंबिवली रेल्वे स्थानक परिसराचा अखेर विकास होणार आहे. डोंबिवलीकरांचा प्रवास सुखकर होणार असून स्थाकाजवळ राहणाऱ्या नागरिकांना आणि वाहनचालकांनाही मोठा फायदा होणार आहे. सॅटिस प्रकल्पांतर्गत डोंबविली स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुधारली जाणार आहे. यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मिळून स्थानक परिसराची पाहणी सुरू केली आहे.
रिक्षा, वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांचे हाल
उपनगरिय रेल्वेवर सर्वाधिक गर्दी असलेल्या स्थानकांपैकी एक डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. दररोज हजारो प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकावरून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावर प्रवास करतात. त्यात स्थानक परिसरात रिक्षाचालकांही संख्याही मोठी आहे. या सर्व कारणांमुळे स्थानकाबाहेर नेहमी वाहतूक कोंडी होते. अनियमित पार्किंग व्यवस्थेमुळे स्थानकाबाहेर किंवा रेल्वे पुलाखाली अनेक दुचाकी किंवा रिक्षा पार्क केल्या असतात. त्यात फेरीवाल्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरत नाही. आता सॅटिस प्रकल्पामुळे स्थानकाबाहेर प्रवाशांना चालण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे.
डोंबिवली पूर्व ते पश्चिम पोहोचण्यासाठी एक ‘इंटीग्रेटेड स्टेशन कॉम्प्लेक्स’ बांधले जाणार आहे. केडीएमसीची इमारत, रामनगर पोलिस ठाणे, विष्णुनगर पोलिस ठाणे आणि स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या रिकाम्या जागेचा वापर करून हे स्टेशन कॉम्प्लेक्स बांधण्यात येईल. ही जागा केवळ नागरिकांसाठी राखीव ठेवली जाणार असल्यामुळे वाहनचालक आणि फेरीवाल्यांच्या त्रासापासून सुटका होणार आहे.
कसा होणार विकास?
सॅटिस प्रकल्पामध्ये बहु-स्तरिय पार्किंग सुविधा बांधण्यात येणार आहे. पार्क केलेल्या वाहनांमुळे रस्ता अडवला जाणार नाही. त्यासह पदपथांचं रुंदीकरण केलं जाईल. शिवाय पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काही उपाययोजनाही केल्या जातील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानक परिसरातील कोंडी फुटण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी आता ग्राउंड सर्वे सुरू आहे. तो पूर्ण होताच प्रकल्प अहवाल तयार करून बांधकामाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे.
डोंबिवली शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोकल प्रवासीही वाढले आहेत. त्यामुळे स्थानकावरील पायाभूत सुविधांचा विकास करणं आवश्यक आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी सतत या प्रकल्पाचा पाठपुरावा करून एमएमआरडीएला काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्दश दिले आहेत. या विषायवर एमएमआरडेचे आयुक्त संजय मुखर्जींसोबत शिंदेंनी अनेक वेळा बैठक घेऊन चर्चा केली होती. या बैठकीदरम्यान शिंदेंनी अधिकाऱ्यांना तातडीने सर्वे सुरू करून कामाला सुरूवात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच निर्देशांनुसार, केडीएमसी आणि एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी पाहणी करण्यास सुरूवात केली आहे.
