दारूच्या व्यसनाने एका हसत्या खेळत्या कुटुंबाला अक्षरशः उद्ध्वस्त केले आहे. डोळ्यांची जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने मोठ्या मुलाला रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या मृत्यूची बातमी कळताच धक्क्याने लहान भावाचाही मृत्यू झाला. या दोन्ही भावांची चिता विझत नाही तोच वृद्ध वडिलांची प्रकृती अचानक खराब होऊन त्यांनाही अतिदक्षता विभागात हलविण्यात आले असून, त्यांची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.
सर्व गोष्टीला दारूच कारणीभूत
दरम्यान, या सर्व गोष्टीला दारूच कारणीभूत असल्याचे राठोड कुटुंबीय आणि मित्रपरिवार सांगत आहेत. राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४) आणि विजय प्रकाश राठोड (वय ३१) असे मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. त्यांचे वडील प्रकाश उमाजी राठोड (वय ६४) यांच्यावर वायसीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
फुगवाडी येथे राठोड कुटुंब एकत्रपणे राहते. दोन्ही भाऊ कंपनीमध्ये काम करतात. राजेंद्र यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे, तर विजय यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. दोन्ही भावांना दारू पिण्याची सवय असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. मंगळवारी रात्री मोठे बंधू राजेंद्र राठोड यांच्या डोळ्यांची जळजळ होऊ लागली. त्याबाबत त्यांनी पत्नीला सांगितले. बुधवारी सकाळी ते कंपनीत कामाला गेले. तिथे जास्त प्रमाणात त्रास झाला; तसेच श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना खडकी कँटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मोठ्या भावाच्या निधनाची बातमी कळताच लहान भाऊ विजय राठोड याला जबरदस्त धक्का बसला. त्यांनाही अचानक फिटसारखा त्रास होऊन जागीच कोसळले. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
मृतदेह पाहताच आक्रोश
गुरुवारी संध्याकाळी दोन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातील दोन तरुण मुलांचे मृतदेह घरात पोहोचताच आक्रोश करण्यात आला. वृद्ध आईचा हंबरडा, पत्नीचा टाहो आणि ‘आमचे पप्पा कधी येणार…’ असा निरागस प्रश्न विचारणाऱ्या चिमुकल्यांच्या आवाजाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. संसार उभा करण्यासाठी मुंबई सोडून आलेल्या या भावांनी कष्टाचे आयुष्य जगत मुलांच्या भविष्यासाठी स्वप्न पाहिले होते. मात्र, त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
दोन मुलांच्या मृत्यूचा आघात वडील प्रकाश उमाजी राठोड यांनाही सहन झाला नाही. शुक्रवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना त्रास होऊ लागल्याने तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, ‘आयसीयू’मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वडिलांनाही दारूचे व्यसन असून, त्यांनीही दोन दिवसांपूर्वी दारू प्यायली होती, असे कुटुंबीयांनी सांगितले.
