तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत गेल्या वर्षभरात तब्बल ४८ कोटी ७१ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न जमा झाले आहे. मागील आर्थिक वर्षात मंदिर संस्थानला एकूण महसूली खर्च वगळता तब्बल पावणेसहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. वर्षभरात देशभरातील भाविकांनी तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत दहा किलो सोने आणि २६७ किलो चांदी अर्पण केली आहे.

मंदिर संस्थानला तब्बल कोटींचा नफा

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या मागील आर्थिक वर्षाचा लेखाजोखा अर्थात महसुली अहवाल जाहीर करण्यात आला आहे. मंदिर संस्थानला मागील वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा नफा झाला असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. एक एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या आर्थिक वर्षात विविध माध्यमांतून मंदिर संस्थानला तब्बल ४७ कोटी ५७ लाख ४४ हजार ८०३ रुपये एवढी रोकड भाविकांनी अर्पण केली आहे, तर संस्थानने वेगवेगळ्या साहित्यांच्या विक्रीतून एक कोटी १३ लाख रुपयांचे रोख उत्पन्न प्राप्त केले आहे.

मंदिर समितीला मागील वर्षभरात एकूण ४८ कोटी ७१ लाख ३२ हजार ४४ इतकी रोकड प्राप्त झाली आहे. मागील वर्षभरात जमा आणि महसुली खर्च याचा ताळमेळ पूर्ण झाल्यानंतर मंदिर समितीला तब्बल पावणेसहा कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. मंदिर संस्थानच्या अधिकृत आर्थिक विवरणपत्रकातून ही माहिती समोर आली आहे. मंदिराला मिळालेल्या रोख स्वरूपातील उत्पन्नातून भक्तांच्या सोयी-सुविधा आणि इतर विकासकामांवर ४२ कोटी ७९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. भाविकांच्या सोयी-सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य देऊन मंदिर प्रशासनाने सढळ हाताने खर्च केला आहे.

मोठी रक्कम खर्च करण्यात आली

ट्रस्टच्या उद्दिष्टानुसार खर्च केल्या जाणाऱ्या धार्मिक व सामाजिक कामावरही तब्बल २४ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त घसारा खर्च, मालमत्ताविषायक खर्च, खरेदी खाते, इतर युनिटचा खर्च यांवरही मोठी रक्कम खर्च करण्यात आली असून, मुख्य व इतर खर्चापोटी आठ कोटी ६० लाख रुपयांचा खर्च आर्थिक विवरणपत्रकात नमूद करण्यात आला आहे. मागील वर्षभरात ४८ कोटी ७१ लाख ३२ हजार रुपये एवढे एकूण महसुली उत्पन्न रोख स्वरूपात जमा आहे. तर ४२ कोटी ७९ लाख १७ हजार एवढा महसुली खर्च आहे आणि पाच कोटी ९२ लाख १४ हजार निव्वळ नफा मंदिर संस्थानकडे रोख स्वरूपात जमा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *