सासरचा छळ असह्य, दोन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन आयुष्य संपवलं, आधी लेकराची बॉडी सापडली नंतर आईची

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. कौटुंबिक छळाला वैतागून एका विवाहित महिलेनं दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास मैंदर्गी येथे ही घटना घडली. या घटनेनंतर मृत महिलेच्या आईने सासरच्या सात जणांविरोधात संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाग्यश्री सिद्धप्पा कट्टीमनी (वय 30, रा. मैंदर्गी) या महिलेनं आपला मुलगा शिवराज सिद्धप्पा कट्टीमनी (वय 2 वर्ष) याला घेत मंगळवारी दुपारी तोरणी रोडलगत असलेल्या विहिरीत आपल्या मुलासह उडी घेत आत्महत्या केली आहे. भाग्यश्रीने आत्महत्या केल्याची माहिती तत्काळ तिच्या नातेवाइकांनी माहेरी कळविली.

सुरुवातीला शिवराजचा मृतदेह आढळला

मुलीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच भाग्यश्रीची आई कलव्वा बसप्पा पुजारी (रा. भोसगा पुजारी, ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी, कर्नाटक) या नातेवाइकांसह तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने विहिरीतून प्रथम दोन वर्षीय शिवराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. याचदरम्यान भाग्यश्रीचा शोध सुरू असताना तिचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात पाठवला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिलाही मृत घोषित केले.

कौटुंबिक छळातून आत्महत्या केल्याची फिर्याद

मृत भाग्यश्रीच्या आईने दिलेल्या जबाबात, मुलीचा सासरच्या मंडळींकडून वारंवार छळ होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाखल केलेल्या फिर्यादीनुसार तिपव्वा कट्टीमणी, शरणप्पा कटीमणी, सिद्धप्पा कट्टीमणी, समर्थ कट्टीमणी, नागनाथ कट्टीमणी, गगव्वा पुजारी आणि यालप्पा कट्टीमणी यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सासू, सासरे, पती, दोन दीर, नणंद आणि अन्य नातेवाईक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौजदार अमोल माने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *