धरणात उतरणं पडलं महागात, पाण्याचा अंदाज न आल्यानं पती-पत्नीसह शेजारील दोन लेकरं बुडाली; आई-वडिलांचा मृत्यू चिमुकलीनं डोळ्यांनी पाहिला

नाशिकच्या कश्यपी धरण येथे गेलेल्या पती-पत्नी आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघा मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी मयत पती-पत्नी यांची दोन वर्षांची मुलगी ही काठावरच होती. घटनेची माहिती मिळताच ज्याठिकाणी ही घटना घडली त्या धरण काठावर पोलिसांना ही चिमुरडी आढळून आली. तिला तिच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. याबाबत नाशिकच्या हरसुल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरसुल पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या कश्यपी धरण येथे नाशिक येथे राहणारे मयत सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे पती-पत्नी आणि त्यांच्या घराशेजारी राहणारे केतन पवार (वय 17) आणि कौशल पवार (वय 14) या दोन मुलांचा कश्यपी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कश्यपी धरण येथे फिरण्यासाठी गेले असता पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्यानं ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

घटनेची माहिती मिळताच हरसुल पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. स्थानिक ग्रामस्थ आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या चौघांचे मृतदेह हे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. अखेर अथक प्रयत्नानंतर रात्र होण्याआधीच स्थानिकांना चारही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यांनंतर जिल्हा शासकीय रुग्णालय येथे हे चारही मृतदेह पाठविण्यात आले आहेत. घटनेबाबत हरसूल पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हरसूल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आणि मुलांना शाळेला लागलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांकडून धरण परिसरात गर्दी केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून देखील अशा घटना घडू नये यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे.

त्र्यंबकच्या प्राचीन वैभवाचा चिरा निखळला

सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली शहरातील प्राचीन वारसा धोक्यात येत असून, कुशावर्तासह शहरातील प्राचीन तलाव तोडफोडीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप नागरिक व वारसाप्रेमींनी केला आहे. त्याचबरोबर दर्शनपथासाठी त्र्यंबकराज मंदिराचा कोट मोकळा चिरा निखळून पडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बांधकामांचा वारसा

हजार वर्षांहून अधिकचा इतिहास लाभलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये शिलाहार-राष्ट्रकूट कालखंडातील मंदिरांचे अवशेष, संत निवृत्तिनाथ महाराजांची संजीवन समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श, तसेच नानासाहेब पेशवे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातील बांधकामांचा वारसा आहे. अशा शहरात तलावांच्या दगडी काठांची मोडतोड सुरू असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *