कानपूरमध्ये काल मेट्रोसंदर्भात एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे. कानपूर सेंट्रलकडून ट्रान्सपोर्ट नगर मेट्रो स्टेशनच्या दिशेने 80 किमी/तास वेगाने धावणारी ट्रेन आणि त्याच ट्रॅकवर, ट्रान्सपोर्ट नगरच्या दिशेने 80 किमी/तास वेगाने जाणारी दुसरी मेट्रो ट्रेन एका बोगद्यात अगदी एकमेकांच्या समोरा समोर आल्यात. या दोन्ही मेट्रोमध्ये ब्रेक लावण्यासाठी कोणी नसताना मेट्रोची आता टक्करच होणार त्याच्या 20 मीटर आधी दोन्ही मेट्रो ट्रेन आपोआप थांबली. झालं असं की मंगळवारी कानपूरमध्ये सेंट्रल स्टेशन ते नौबस्ता दरम्यानच्या कॉरिडॉर-1 च्या नव्याने बांधलेल्या भागावर एका हाय-टेक टक्कर चाचणीदरम्यान ही घटना घडली. खरंतर ही एक हाय-टेक टक्कर चाचणीचा एक भाग होता. या ट्रायल रनमुळे कानपूर मेट्रोने एक इतिहास रचला आहे.
मेट्रोच्या अत्याधुनिक सीबीटीसी सिग्नलिंग प्रणाली आणि ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन मोडची विश्वसनीयता तपासण्यासाठी कानपूरमध्ये मंगळवारी मेट्रोची टक्कर चाचणी घेण्यात आली. उत्तर प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुशील कुमार यांनी या चाचणीची माहिती देताना सांगितलं की, चाचणीदरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत ट्रेनची स्वयंचलित सुरक्षा प्रणाली किती जलद आणि अचूकपणे कार्य करते हे तपासण्यासाठी दोन मेट्रोची बोगद्यात मेट्रो मन नसताना टक्कर चाचणी घेण्यात आली. ट्रेन निर्धारित अंतरावर पोहोचताच, दोन्ही ट्रेनची ब्रेकिंग प्रणाली आपोआप सक्रिय झाली आणि ट्रेन थांबल्या, यामुळे मेट्रोने एक नवीन इतिहास रचला आहे.
यापूर्वी, ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन मोडमध्ये यशस्वी चाचण्या झाल्या आहेत. त्यांनी सांगितलं की, दोन्ही ट्रॅकवर ताशी 80 किमीच्या कमाल वेगाने हाय-स्पीड चाचण्या आणि स्पीड ब्रेक चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. एका परदेशी संस्थेद्वारे स्वतंत्र सुरक्षा मूल्यांकनही यावेळी करण्यात आलं आहे. ज्यामध्ये सिग्नलिंग आणि सुरक्षा मानके समाधानकारक असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशा चाचण्या अत्यंत महत्त्वाच्या असतात, असं ते म्हणालेत. कॉरिडॉर 1 च्या उर्वरित भागाचे, तसंच कॉरिडॉर 2 चे बांधकाम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
