त्र्यंबकच्या प्राचीन वैभवाचा चिरा निखळला, दुकाने हटविताना मंदिराभोवतीचा कोट नुकसानग्रस्त; वारसा जतनाकडे दुर्लक्ष

सिंहस्थ कुंभमेळा विकासकामांच्या नावाखाली शहरातील प्राचीन वारसा धोक्यात येत असून, कुशावर्तासह शहरातील प्राचीन तलाव तोडफोडीच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप नागरिक व वारसाप्रेमींनी केला आहे. त्याचबरोबर दर्शनपथासाठी त्र्यंबकराज मंदिराचा कोट मोकळा चिरा निखळून पडल्याने चिंता व्यक्त होत आहे.

बांधकामांचा वारसा

हजार वर्षांहून अधिकचा इतिहास लाभलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये शिलाहार-राष्ट्रकूट कालखंडातील मंदिरांचे अवशेष, संत निवृत्तिनाथ महाराजांची संजीवन समाधी, छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श, तसेच नानासाहेब पेशवे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या काळातील बांधकामांचा वारसा आहे. अशा शहरात तलावांच्या दगडी काठांची मोडतोड सुरू असल्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग व राज्य पुरातत्त्व विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहरातील तलावांवरील दगडी नक्षीदार चिरे काढून टाकून त्याजागी यंत्रावर घासलेले नवे दगड बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. काही जुन्या दगडांवर नक्षीबरोबर मजकूरही असल्याचे सांगितले जाते; मात्र त्यांचा अभ्यास, नोंदणी किंवा जतन करण्याची प्रक्रिया होत नसल्याची तक्रार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्मारकांच्या यादीत असून कुशावर्त तीर्थ, बल्लाळेश्वर मंदिर आणि इंद्राळेश्वर तीर्थ हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणाखाली आहेत; मात्र शहरातील अनेक तलाव असंरक्षित यादीत असल्याने त्यांच्यावर थेट हस्तक्षेप होत असल्याचे चित्र आहे. कुंभमेळा प्राधिकरणाने गौतमी बेझे धरणाचे पाणी तलावांत सोडण्याच्या उद्देशाने संवर्धन हाती घेतले असले, तरी वारसामूल्यांचा पुरेसा विचार झाला नसल्याचा आरोप होत आहे.

वारसा जतनाकडे दुर्लक्ष

दर्शनपथासाठी मंदिरालगतची दुकाने हटवताना जेसीबीचा वापर झाल्याने सुमारे तीनशे वर्षांपूर्वीच्या मंदिराच्या कोटाच्या भिंतीचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षित स्मारकापासून १०० मीटर परिसरात खोदकाम-बांधकामास मनाई असताना दर्शनपथाचे काम कसे होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील १५० ते ३०० वर्षांहून जुने वाडे व इमारतीही दुर्लक्षित असल्याचे चित्र असून, त्र्यंबकेश्वरला ‘हेरीटेज’ घोषित करण्याच्या घोषणेनंतरही प्रत्यक्षात वारसा जतनासाठी ठोस पावले दिसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *