13 रुपयांचा वडापाव आता किती रुपयांना? मुंबईकर रेल्वे स्थानकांवरील खाद्यपदार्थ 1 जूनपासून महागणार

अमेरिका आणि इराण संघर्षामुळे इंधन इतर देशांनाही त्याची झळ बसली आहे. इंधन टंचाईचा परिणाम भारतालाही बसला असून महागाईचे चटके सर्वसामान्यांना बसत आहे. पेट्रोल – डिझेलचे भाव त्यानंतर गॅस सिलेंडरची दरवाढ, भाज्यांही महागल्यात आणि आता मुंबईकरांची पोटपूजाही 1 जूनपासून महागणार आहे. मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ 1 जूनपासून महागणार असल्याने मुंबईकरांच्या खिशाला अजून कात्री लागणार आहे. एक दिलासादायक गोष्ट म्हणजे रेल्वे स्टेशनवरील स्टॉल्सवरील संत्रे, मोसंबी आणि सफरचंदाच्या ज्यूससारख्या पेयांच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. पण मुंबईकरांचा आवडता पदार्थ वडापाव, समोसा आता महाग झाला आहे.

मुंबईकरांना वडापावसाठी 13 रुपये द्यावे लागत होते. आता  नव्या दरानुसार 1 जूनपासून वडापाव मुंबईकरांना 20 रुपये द्यायचे आहेत. तर ज्या समोसासाठी 12 रुपय मोजावे लागत होते त्यासाठी खिशातून 20 रुपये जाणार आहे.  या भाववाढीमुळे 1 जूनपासून मुंबईकरांचं महिन्याच बजेट गडबडणार आहे.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पश्चिम रेल्वेने 2025 मध्ये स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात बदल करण्यात आली होती. त्यापूर्वी रेल्वे स्टेशनवरील खाद्यपदार्थांची दरवाढ 2021 मध्ये झाली होती. त्यानंतर आता मध्य रेल्वेनेही नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे महागाईच्या भडक्यात सर्वसामान्यांना अजून एक झटका लागला आहे. पण दुसरीकडे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलंय की, रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर अजून काही नवीन खाद्यपदार्थही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यात स्लश, डोनट विथ क्रीम, सूप, डोसा आणि नूडल्स असे पदार्थ आता तुम्हाला रेल्वे स्टेशनवरील स्टॉलमध्ये मिळणार आहेत.

मुंबईकर 1 जूनपासून रेल्वे स्टेशनवर असा असणार खाद्यपदार्थांचे दर

खाद्यपदार्थ   जुना दर नवा दर
वडापाव 13 20
समोसा 12 20
रगडा पाव 20 25
पाव 3 5
रगडा/उसळ/1 पाव 20 25
सुकी भेळ 20 25
चटणी भेळ 25 30

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *