मदरशांत ‘वंदे मातरम्’ अनिवार्य; पश्चिम बंगाल सरकारचा मोठा निर्णय, एकसूत्रता आणण्याचा उद्देश

पश्चिम बंगालमधील भाजप सरकारने वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्व मदरशांच्या प्रार्थना सत्रांमध्ये ‘वंदे मातरम’चे गायन अनिवार्य केले आहे. हा आदेश तत्काळ प्रभावाने लागू झाला. सरकारने सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत गाणे अनिवार्य केल्यानंतर जवळपास एका आठवड्याने मदरसा शिक्षण संचालनालयाकडून हा आदेश जारी करण्यात आला.

सर्व संस्थांच्या प्रार्थना उपक्रमांमध्ये एकसूत्रता आणण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. ‘सरकार शिक्षण क्षेत्राच्या बिघडलेल्या स्थितीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे,’ असा आरोप माकपचे ज्येष्ठ नेते सुजन चक्रवर्ती यांनी केला

सीएपीएफ २० जूनपर्यंत
पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीवरून निवडणुकीनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ५०० तुकड्या २० जूनपर्यंत तैनात ठेवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. सीआरपीएफच्या २००, बीएसएफच्या १५० आणि सीआयएसफ, आयटीबीपी व एसएसबी यांच्या प्रत्येकी ५० अशी एकूण ५०० तुकड्या राज्यात २० जूनपर्यंत तैनात ठेवण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, गृहसचिव आणि पोलिस महासंचालकांना कळवले आहे.

चौकशीसाठी एसआयटी

आर. जी. कार वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार व हत्याप्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयच्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचे आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरने रात्रीचे जेवण घेतल्याच्या वेळेपासून तिच्या अंत्यसंस्कारापर्यंत घडलेल्या घडामोडींचा तपास हे पथक करणार आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे स्वीय सहायक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी, उत्तर प्रदेशच्या विशेष कृती दलाने बलिया जिल्ह्यातून एका ३५ वर्षीय आरोपीला अटक केली.

फाल्टामध्ये ८६ टक्के मतदान
पश्चिम बंगालमधील ‘फाल्टा’ विधानसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या फेरमतदानात दुपारी पाच वाजेपर्यंत २.३६ लाख मतदारांपैकी ८६ टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ईव्हीएममध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याच्या आरोपांमुळे २९ एप्रिल रोजी या मतदारसंघात झालेले मतदान रद्द करण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने फेरमतदानासाठी दुप्पट सुरक्षा व्यवस्थेत तैनात केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *