कल्याणकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्यांमधील प्रचंड गर्दीमुळे कळवा स्थानकावर प्रवाशांना गाड्यांमध्ये चढणे अवघड होत असल्याने गेल्या १५ ते २० वर्षांपासून अनेक प्रवासी कळवा कारशेडमधील लोकलमधून प्रवास करत होते. मात्र, रेल्वे प्रशासनाने नुकतेच कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर भिंत आणि प्रवेशद्वार उभारून प्रवाशांची ये-जा बंद केली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रवासी संघटनांनीही निषेध केला आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश लोकल सकाळच्या गर्दीच्या वेळी आधीच भरलेल्या अवस्थेत कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर पोहोचतात. त्यामुळे या स्थानकांवरील प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते. यावर उपाय म्हणून अनेक प्रवासी कळवा कारशेडमध्ये उभ्या असलेल्या आणि ठाणे स्थानकातून सुटणाऱ्या रिकाम्या लोकलमध्ये बसून प्रवास करत होते. प्रवाशांचा हा मार्ग रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. सुरुवातीला काही सामान्य लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर करण्यात आले. तसेच रेल्वे सुरक्षा दलाचा बंदोबस्तही वाढवण्यात आला. मात्र, तरीही प्रवासी कारशेडमधील इतर लोकलमध्ये प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने कारशेडकडे जाणाऱ्या मार्गावर भिंत उभारली. तसेच प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले आहे.
प्रवासी संघटनांकडून निषेध
कळवा कारशेडमधून ठाण्याकडे जाणाऱ्या रिकाम्या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मार्ग बंद करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाचा मुंबई रेल प्रवासी संघ आणि कळवा पारसिक प्रवासी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. प्रवाशांकडे वैध तिकीट असूनही स्थानकांवरील प्रचंड गर्दीमुळे त्यांना लोकलमध्ये चढणे शक्य होत नसल्याने त्यांनी कारशेडमधून प्रवासाचा पर्याय स्वीकारला होता. मात्र, कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता हा मार्ग बंद केल्याने नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी कोंडी झाली असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे
जनक्षोभाची भीती
कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता हा निर्णय लागू केल्यामुळे भविष्यात प्रवाशांचे आंदोलन किंवा जनक्षोभउसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी या मार्गावरील एक सामान्य लोकल एसी लोकलमध्ये रूपांतरित केल्यानंतर रेल रोको आंदोलन झाले होते. त्यामुळे सध्याच्या निर्णयामुळेही तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्याची भीती प्रवासी संघटनांनी व्यक्त केली आहे.
कळव्यातून लोकलची मागणी
मुंबई रेल प्रवासी संघ आणि कळवा पारसिक प्रवासी संघटना यांनी कळव्यातून स्वतंत्र लोकल सेवा सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने केली आहे. यासाठी महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक, रेल्वे बोर्ड आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदने देण्यात आली असून आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र कळवा प्रवाशांसाठी अतिरिक्त लोकल सेवा किंवा अन्य पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उलट कोणताही पर्याय न देता कारशेडचा प्रवेश बंद करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि असंवेदनशील असल्याचे मत प्रवासी संघटनेचे सिद्धेश देसाई यांनी व्यक्त केले
