आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज, मंगळवारी (सात जुलै) देहू येथून प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. मुसळधार पावसामुळे प्रस्थान सोहळ्याच्या तयारीला मर्यादा आहेत. मात्र, ग्रामस्थ आणि वारकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. ते तुकोबासंगे सावळ्या विठूरायाला भेटण्यासाठी आतुर आहेत. देहू येथील मुख्य मंदिरात सोहळ्याची जय्यत तयारी चालू आहे.
सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ
सोहळ्यासाठी यंदा नवीन रथ तयार करण्यात आला आहे. भरपावसात रथाची मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इंद्रायणीला पूर आल्याने नदीकिनारी बॅरिकेडींग केले असून, वारकऱ्यांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आळंदीत प्रस्थान सोहळा मर्यादित स्वरुपात
आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे उद्या, बुधवारी प्रस्थान होणार आहे. त्या अनुषंगाने नवीन रथ अर्पण सोहळा सोमवारी आयोजित केला होता; परंतु मुसळधार पावसामुळे कार्यक्रम स्थगित करण्यात आला. पावसामुळे प्रस्थान सोहळाही मर्यादित स्वरूपात होणार असून, वारकरी, मानकरी, ग्रामस्थ, पोलिस आदी १६६० जणांना फक्त मंदिर प्रवेश मिळेल.
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा रुपरेषा
पहाटे ५ वा. ‘श्रीं’ची आणि शिळा मंदिर महापूजा
पहाटे ५.३० वा. तपोनिधि नारायण महाराज समाधी पूजा
सकाळी ९ वा. पादुका महापूजा, इनामदार वाडा
सकाळी १० वा. काल्याचे किर्तन
दुपारी २.३० वा. प्रस्थान सोहळा प्रारंभ
सायंकाली ५ वा. पालखी मंदिर प्रदक्षिणा
सायंकाळी ६ वा. समाजआरती व मुक्काम, इनामदार वाडा
नाथांच्या दिंडीचेआज प्रस्थान
श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा आज, मंगळवार सात जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. नाथांच्या दिंडीचे आज, मंगळवारी (सात जुलै) प्रस्थान होणार आहे.
आज, मंगळवारी दुपारी बारा वाजता पैठण येथील गावातील नाथ मंदिर येथून नाथांच्या पालखीचे प्रस्थान होईल. विसावा ओटा येथून सायंकाळी साडेसहा वाजता पालखी चनकवाडीकडे प्रस्थान करणार आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजन होऊन पालखी प्रस्थान करणार आहे. पैठणच्या दिंडीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील अनेक दिंड्या, वारकरी पैठणनगरीत दाखल झाले आहेत. पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली.
