नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर परिसरात आज ढगफुटीसदृश पावसाचा इशारा हवामान खात्याकडून काल देण्यात आला होता. हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर नाशिक महापालिकेसह जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पुरेशी खबरदारी घेण्याचा सल्ला देत विविध उपाययोजना केल्या. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टीही जाहीर करण्यात आली होती. मात्र ज्या भोवऱ्यामुळे नाशिक जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता तो भोवरा आता दुसऱ्या जिल्ह्याकडे सरकल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळले असल्याचे जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये काल सुमारे ४५० मिमी पाऊस पाडणारा भोवरा त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता होती. मात्र हा भोवरा (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतकडे व दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले परिसराकडे सरकल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता नाशिक नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
मध्यरात्री शहराला पावसाने झोडपले!
नाशिक शहरात रात्री साडेअकरा ते मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान 21 मिमी पाऊसझाला. सोमवारी सकाळी साडेआठ ते मंगळवारी पहाटे साडेपाच या कालावधीत 61.8 मिमी पावसाची नोंद झाली असून मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नाशिकमध्ये यापूर्वी झालेला सर्वाधिक पाऊस…
१० जुलै २०१६ ते ११ जुलै २०१६ या २४ तासांत १६० मिमी पावसाची नोंद
जुलै २०१६ रोजीचा पाऊस ठरला दहा वर्षांतील २४ तासांमधील सर्वाधिक
१ डिसेंबर २०२१ रोजी ६३.८ मिलिमीटर पावसाची झाली होती नोंद
वंजारवाडी (ता. नाशिक) येथे ३१ ऑगस्ट २०२२ रोजी ढगफुटीसदृश पाऊस
मुसळधार पावसाने वंजारवाडी भागात दोनशे हेक्टर शेती गेली होती वाहून
८ आणि ९ सप्टेंबर २०२२ रोजी सिन्नर गावात अतिवृष्टीची नोंद
जिल्ह्यातील पावसाळी वन पर्यटन बंद
नाशिक जिल्ह्यातील काही भागात आज ढगफुटीसदृश पावसाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक वनवृत्तातील पावसाळी वन पर्यटन पूर्णतः बंद करण्यात आले आहे.अंजनेरी, हरिहरगड, सांधण दरी, हरिश्चंद्रगड यासह इतर ठिकाणच्या प्रवेशबंदीबाबत वन विभागाने आदेश जारी केले आहेत. यासह पहिने, भंडारदऱ्यासह वन परिक्षेत्रातील हद्दीत पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. वाढत्या पावसामुळे गेल्या आठवड्यापासून त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील हरिहरगडावर पूर्वपरवानगीनुसार पर्यटकांना प्रवेश देण्यात येत होता. यासह पहिने आणि त्र्यंबकेश्वर परिसरात ठराविक ठिकाणीच पर्यटकांना परवानगी होती. परंतु, पावसाचा जोर आणखी वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आणि वन हद्दीतील अपघात टाळण्यासाठी आता पुढील आदेशापर्यंत सर्व ठिकाणी प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर वन परिक्षेत्रातील ब्रह्मगिरी, हरिहरगड, दुगारवाडी धबधबा आणि पहिने येथील नेकलेस फॉल ही सर्व पर्यटनस्थळे बंद राहणार असल्याबाबतचे आदेश त्र्यंबकेश्वरचे वन परिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी जारी केले आहेत. यासह पूर्वपरवानगीनुसारही कोणालाही प्रवेश नसेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. स्थानिक सुरक्षारक्षक, गाइडशी हुज्जत घालणाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
