जिल्ह्यात दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २२ ठिकाणी दरड कोसळण्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी तिघांचा मावळ तालुक्यातील पाटण येथे घरावर दरड कोसळून झालेल्या अपघातात मृत्यू झाला. विविध घटनांमध्ये २० नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. ३० जणांची सुरक्षित सुटका केली असून, पाचशेहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
एका वर्षापूर्वीच लग्न
मळवलीजवळ, विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावातील एका घरावर सोमवारी पहाटे साडेचारला दरड कोसळली. या दुर्घटनेत पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर नंदू तिकोने (वय २५), नंदू दत्तू तिकोने (वय ५५), अनिता नंदू तिकोने (वय ५०) अशी मृतांची नावे आहेत. ज्ञानेश्वर याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याची पत्नी गरोदर असल्याने ज्ञानेश्वर आणि कुटुंबीयांनी तिला मळवली येथील बंगल्यात ठेवले होते. यामुळे तिचा जीव वाचला.
