पुण्यात ६ दिवसांत पावसाने बॅकलॉग भरून काढला, आणखी दोन दिवस जोरदार बरसणार;

शहर आणि जिल्ह्यात रविवारी जोरदार हजेरी लावलेला पाऊस सोमवारीही दिवसभर बरसला. शहरात रात्री साडेआठपर्यंत ५३ मिलिमीटर, तर चिंचवडमध्ये १३२ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री उशिरापर्यंतही पाऊस सुरूच होता. रविवारी आणि सोमवारी झालेल्या पावसाने केवळ जुलै महिन्यातील सरासरीच ओलांडली नाही, तर जूनची राहिलेली तूटही भरून काढली.

बंगालच्या उपसागरात तयार झालेली द्रोणीय स्थिती आणि पश्चिम किनारपट्टीवर महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, सह्याद्री आणि कोकण पट्ट्यात सध्या पाऊस पडतो आहे. पुढील दोन दिवस पोषक वातावरण राहणार असल्याने पाऊसही सुरू राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

पुणेकरांनी रविवारी सुटीच्या दिवशी दिवसभर संततधार आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस अनुभवला. रात्रीनंतर पावसाचा जोर वाढत गेला आणि सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता. दुपारी एकच्या सुमारास संपूर्ण शहरात मोठी सर पडली. दिवसभर अधूनमधून हलक्या सरी पडतच राहिल्या. त्यामुळे मध्यवर्ती पुण्यासह उपनगरांमधील वाहतूक संथ झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी साठलेले पाणी, खड्ड्यांमधून वाट काढताना नागरिकांची गैरसोय झाली. जिल्ह्याधिकाऱ्यांनी शाळांना सुट्ट्या दिल्या होत्या, त्यामुळे मुलांना पालकांनी घराबाहेर पाठवलेच नाही.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी शहरातील विविध भागांत पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांनी व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *