कोकणालाही पाण्याचा वेढा; रायगडमधील पूरस्थिती गंभीर, अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, वाहतुकीवर परिणाम

कोकणात पावसाचे धुमशान सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संततधार सुरूच राहिल्याने खेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती. रायगडमध्ये पूरस्थितीमुळे १४ गावांतील २६५ कुटुंबांतील ९३७ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले, तर २००हून अधिक नागरिक व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली.

शहरासह तालुक्यात झाडे कोसळण्याचे प्रकार

खेडमध्ये जगबुडी नदी सोमवारी रात्रीपर्यंत ७.२ मीटरवरून वाहत होती. चिपळूण शहरासह तालुक्यात झाडे कोसळण्याचे प्रकार घडले. दापोली तालुक्यातील बहुतांश भाग रविवारपासून दोन दिवस अंधारात होता. मंडणगड तालुक्यातील रत्नागिरी-रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन बार्जनी जोरदार धडक दिल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. दापोली-पालवणी-मंडणगड मार्गावरील दादर पूल पाण्याखाली गेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक फटका वैभववाडी तालुक्याला बसला. कुंभवडे येथील हरिश्चंद्र राऊत यांचे घर कोसळले. वाभवे येथील उमेश गावडे यांच्या घरावर वडाचे झाड पडून नुकसान झाले. मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस परिसरात मोठे झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.

दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद

रायगड जिल्ह्यात पावसाने थैमान घातल्याने रविवारी रात्रीपासूनच माणगाव-कोकण- पुणे जोडणारा ताम्हिणी घाटात रस्ता खचल्याने व दोन ठिकाणी दरड कोसळल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद झाला होता. रत्नागिरी- रायगड जिल्ह्याच्या हद्दीजवळ असलेल्या महाड विन्हेरे तुळशी खिंड नातू नगर या रस्त्यावरील तुळशी खुर्द गावाजवळ मध्यरात्री मोठी दरड कोसळली. रोहा, नागोठणे आणि महाड शहर जलमय झाले. रायगडमध्ये सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी २३६.६० मिमी पावसाची नोंद झाली. सावित्री, अंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली असून, पाताळगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. नागोठणे येथे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग पाण्याखाली गेला. अतिवृष्टीमुळे पनवेल, कर्जत आणि महाड येथे जीवितहानीच्या घटनाही घडल्या असून तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर पाच व्यक्ती बेपत्ता आहेत.

‘काळ’ रोखला उंबरठ्यावरच

खेड तालुक्यातील कशेडी घाटाजवळ खवटी मंडलिक कोंड येथे अख्खा डोंगरच मुंबई-गोवा महामार्गावर कोसळला. घरात झोपलेल्या जाधव कुटुंबाला मध्यरात्री उशिरा मोठा आवाज ऐकू आला आणि काळजात धस्स झाले. त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील तसेच विठ्ठल जाधव यांना घटनेची माहिती दिली. ‘नशिबाने आमची माणसे बचावली आहेत’ अशी प्रतिक्रिया विठ्ठल जाधव व कृष्णा जाधव या प्रत्यक्षदर्शींनी दिली.

बारा तासानंतर वाहतूक सुरू

खेडमध्ये दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूंनी सुमारे ५०० वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी सोमवारी पहाटे साडेचार वाजता एक जेसीबी आणि दोन डम्परद्वारे दरड उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. दुपारी १.५५ वाजता पहिले वाहन मुंबईच्या दिशेने सोडण्यात आले. रत्नागिरी रेल्वे स्थानकात नव्यानेच उभी करण्यात आलेली शेड कोसळली. त्यात जीवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *