कुटुंबप्रमुख अचानक ओरडला; वाचवायला गेलेली पत्नी अन् दोन्ही मुलंही मृत्युमुखी; साताऱ्यातील घटनेनं हळहळ

फलटण तालुक्यातील खामगावमध्ये दुर्दैवी घटना घडली असून एकाच कुटुंबातील चौघांचा विजेच्या शॉकने जागीच मृत्यू झाला आहे. घराच्या अंगणात कुटुंबातील व्यक्तीला शॉक लागल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यही धावले. मात्र या प्रयत्नात एकमेकांना पकडल्याने विजेचा शॉक लागून आई, वडील, मुलगा आणि मुलगी, असे चौघेही मृत्युमुखी पडले. सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे (वय 45), गंगुबाई सतीश शिंदे (वय 40), सचिन सतीश शिंदे (वय 26) आणि आरती सतीश शिंदे (वय 24, रा. खामगाव, ता. फलटण), अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी पहाटे ६ वाजण्याचा सुमारास सतीश उर्फ पिसुरड्या शिंदे हे घराबाहेर थांबले होते. यावेळी ते विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यानंतर सतीश यांना विजेचा शॉक लागला. त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी आणि मुलांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र, सतीश शिंदे यांच्यानंतर त्यांची पत्नी आणि दोन मुलांनाही विजेचा जबर धक्का बसला.

विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेलं शिंदे कुटुंब हे फलटण तालुक्यातील खामगावातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेजवळ वास्तव्यास होतं. बुधवारी सकाळी उठून घराबाहेर आलेल्या सतीश उर्फ पिसुरड्या किसन शिंदे यांना विजेचा जोरदार झटका बसला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंबातील चौघांचाही जागीच अंत झाला.

दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ हे पोलीस पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. घराबाहेरील विद्युत वायरमध्ये नेमका वीज प्रवाह कसा आला, यामागे महावितरणचा तांत्रिक बिघाड होता की अन्य काही कारण आहे, याबाबतचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *