सोमवारी मध्यरात्री अतिवृष्टीमुळे खंडाळा घाटमाथा परिसरात रेल्वे मार्गावर सहा ते सात ठिकाणी लोहमार्गावर दरडी कोसळल्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. मागील तीन दिवसांपासून ठप्प झालेली रेल्वे सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दरडी हटविण्याची मोहीम हाती घेतली होती. परंतु घाटमाथा परिसरात सुरू असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे दरडी हटवण्याच्या कामात सातत्याने अडथळे निर्माण होत होते. मात्र आता अखेर रेल्वे प्रशासनाला दरड हटवण्यात यश आलं असून काही गाड्या मुंबईतून पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत.
तीन दिवसांपासून ठप्प झालेल्या मुंबई पुणे रेल्वे सेवेमुळे हजारो प्रवाशांना मोठा फटाका बसला. तसंच रेल्वेचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने सर्व नैसर्गिक अडथळ्यांवर मात करत बुधवारी सकाळी मुंबई पुणे लोहमार्गावरील मिडल लाईनवरील दरड हटवून काही प्रमाणात रेल्वे सेवा सुरू केली. मुंबईहून पुण्याकडे जाणारी इंद्रायणी व इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांसह इतर दोन लांब पल्ल्याच्या जलदगती गाड्या रवाना झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून इतर गाड्या सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, खंडाळा घाटातील ठिकठिकाणच्या दरडी हटवण्याची मोहीम सुरू असताना बुधवारी सकाळी खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ पुन्हा एकदा दरड कोसळल्याने रेल्वे महामार्गावरील दरड संकटात आणखी भर पडली आहे.
मिसिंग लिंकवर कशी आहे स्थिती?
मावळात सोमवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या मिसिंग (कनेक्टिंग) लिंक प्रकल्पाला मोठा फटाका बसला होता. सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग (कनेक्टिंग) लिंकच्या मार्गिकेवरील पहिल्या बोगद्याच्या केबल पुलाकडील तोंडावर मोठी दरड आणि सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेला सिमेंटचा अवाढव्य पिलर, मलबा, काही टन वजनाचे दगड कोसळले होते. यामुळे मिसिंग (कनेक्टिंग) लिंकवरील वाहतूक ठप्प झाली होती. सदर दरड आणि मलबा हटवण्याचे काम करणाऱ्या संबंधित यंत्रणेला दरड हटवण्यात १२ तासांनी यश आले.
