मराठवाड्यातून मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि परिसरातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने मुंबई-नांदेड मार्गावर आणखी दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यातील पहिली विशेष गाडी (क्र. १७६६७) हजूर साहिब नांदेड येथून प्रत्येक बुधवारी रात्री ९.१५ वाजता सुटणार असून पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला आणि मनमाड मार्गे गुरुवारी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा आजरोजी (८ जुलैपासून) सुरू झाली आहे.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १७६६८ प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ४.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटेल. मनमाड, अकोला, वाशिम, हिंगोली, वसमत आणि पूर्णा मार्गे ही गाडी शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीची सेवा ९ जुलैपासून सुरू होणार आहे.
याशिवाय आणखी एक साप्ताहिक रेल्वेही सुरू करण्यात आली आहे. गाडी क्रमांक १७६६५ ही प्रत्येक सोमवारी रात्री ९.१५ वाजता नांदेडहून सुटून मंगळवारी दुपारी १.४० वाजता मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीची नियमित सेवा १३ जुलैपासून सुरू होईल.
तर परतीच्या दिशेने गाडी क्रमांक १७६६६ प्रत्येक मंगळवारी सायंकाळी ४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. ही गाडी बुधवारी सकाळी ९.१० वाजता नांदेडला पोहोचेल. या सेवेची सुरुवात १४ जुलैपासून होणार आहे.
गाड्या कुठे थांबणार?
या चारही विशेष गाड्यांना पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण या स्थानकांवर थांबा असेल. त्यामुळे मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांनाही या गाड्यांचा फायदा होणार आहे.
प्रशासनाचं आवाहन
दरम्यान, या विशेष गाड्यांसाठीचं आरक्षण पीआरएस आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या ऑनलाइन पोर्टलवर सुरू झालं आहे. प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या अतिरिक्त रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे.
