मानखुर्द येथील तरुणाचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. मात्र तरुणीला तो पसंत नसल्याने तिने त्याला नकार दिला. वारंवार सांगूनही तरुणी ऐकत नसल्याने तरुणाने कुटुंबाला घेऊन तिचे घर गाठले आणि लग्नाची मागणी घातली. मात्र त्यासाठीही तिने नकार दिल्याने संतापलेल्या तरुणाने तिचा कॉलेजपर्यंत आणि सोशल मीडियावरही पाठलाग सुरू केला. अखेर या तरुणीने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
मानखुर्द परिसरात राहणारी २४ वर्षीय चंद्रिका (बदललेले नाव) ही नेरूळ येथील डेंटल कॉलेजमध्ये शिकते. ती राहत असलेल्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने तिच्यासोबत मैत्री केली. काही वर्षे मैत्री ठेवल्यानंतर त्याने चंद्रिका हिला त्याचे तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. तरुणीने मात्र यासाठी नकार दिला. तिचे मन परिवर्तन करण्यासाठी या तरुणाने वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले, मात्र तरुणीने आपण मित्र म्हणून राहूया, असे ठामपणे सांगितले. इतके सांगूनही त्याने तिचा पाठलाग सोडला नाही. तिच्या नेरूळ येथील कॉलेजपर्यंत तो पाठलाग करू लागला. चंद्रिका मात्र नकारावर ठाम होती.
चंद्रिका ऐकत नसल्याचे पाहून तरुणाने कुटुंबातील सदस्यांना घेऊन तिचे घर गाठले आणि तिला मागणी घातली. मात्र तेव्हाही तरुणीने लग्नास नकार दिला. यामुळे हा तरुण अधिकच संतापला आणि त्याने तिचा सोशल छळ सुरू केला. वेगवेगळ्या सोशल मीडियावरून मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामध्ये त्याने तरुणीची बदनामी केली. तिच्या वडिलांना शिवराळ भाषेचे ईमेल या तरुणाने पाठवले. इच्छा नसतानाही हा तरुण जबदरस्ती करीत असल्याने आणि तो काहीही करण्याची भीती असल्याने चंद्रिका हिने मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार केली. मानखुर्द पोलिसांनी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
