कॉन्स्टेबलशी दोन वर्ष प्रेमसंबंध; 26 वर्षीय SRPF जवान कौस्तुभ सांगळेसोबत काय घडलं? डायरीत मोठे खुलासे

मुंबईतील लोकभवन येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेला एसआरपीएफचा जवान कौस्तुभ सांगळे (२६) याने प्रेमभंगातून आयुष्याची अखेर केल्याचे समोर आले आहे. प्रेमप्रकरणात अपयशी ठरल्याने आलेल्या नैराश्यातून कौस्तुभ याने हे पाऊल उचलल्याचे त्याच्याकडे सापडलेल्या डायरीतून स्पष्ट झाले आहे.

लोकभवनात कर्तव्यावर असताना टोकाचं पाऊल

मूळचा नाशिकच्या लासलगावचा रहिवासी असलेला कौस्तुभ हा एसआरपीएफच्या घटक १६ (कोल्हापूर) तुकडीत कार्यरत होता. सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास लोकभवन येथे कर्तव्य बजावताना त्याने शासकीय रायफलमधून स्वतःवर गोळी झाडून घेतली. घटनेनंतर मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डायरीतून प्रेमभंगाचा प्रकार उघड

पोलिसांनी कौस्तुभचे सामान तपासले असता, त्यात एक डायरी सापडली. त्यामध्ये फसलेल्या प्रेमसंबंधांमुळे तो प्रचंड निराश होता, हे स्पष्ट झाले. त्याच नोंदी त्याची मृत्यूपूर्व लिहिलेली नोट म्हणून ग्राह्य धरण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिरा-भाईंदर, वसई-विरार आयुक्तालयात नेमणुकीला असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलसोबत कौस्तुभ याचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांची ओळख तीन वर्षांपूर्वी पोलिस प्रशिक्षण अकादमी येथे झाली होती. नोकरीवर रुजू होताच कौस्तुभने तरुणीकडे लग्नाची मागणी केली. मात्र महिला कॉन्स्टेबलने त्याची मागणी धुडकावून लावत संवाद कमी केला. यामुळे कौस्तुभ अस्वस्थ झाला.

महिलेची तक्रार, लग्न जमल्याने धक्का

त्याने संदेश पाठवून, कॉल करून तिची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कौस्तुभ मागे लागल्याने तिने पोलिस ठाण्यात लेखी तक्रारही दिली होती. त्यातच दोन महिन्यांपूर्वी तिचे लग्न जमल्याचे समजल्याने त्याला धक्का बसला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *