आमच्या वाहनात डिझेलच नाही, तुमच्या पोरीला कसे शोधणार, असे बेजबाबदार उत्तर देणारे पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांसोबत अत्यंत निष्काळजी वर्तन करणे राऊत यांच्या अंगलट आले आहे. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रकाशित केले होते.
पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील मुलगी बेपत्ता झाली होती. त्याची तक्रार नोंदवण्यासाठी कुटुंबीय पाचपावली ठाण्यात गेले. बेपत्ता होण्याच्या प्रकरणात पोलिसांकडून तत्परता दाखवणे आवश्यक होते. मात्र, प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना तत्परता दाखवण्याऐवजी पोलिसांनी ‘मुलगी २१ वर्षांची असल्याने ती स्वतःचे निर्णय स्वत: घेऊ शकते, तिला जिथे जायचे असेल तिथे जाऊ शकते’, असे सांगत पोलिस ठाण्यातील वाहनात डिझेल नसल्याचे कारण दिले होते.
‘सरकारकडून तुम्हाला डिझेल मिळते ना’, असे म्हटल्यावर ‘अरे, खरोखरच डिझेल नाही’, असे पोलिस अधिकारी म्हणत असल्याची चित्रफीत व्हायरल झाली होती. त्यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर याबाबतची चित्रफित पोस्ट करत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी ठाणेदार राऊत यांची तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली.
गृहमंत्रालयाकडून दखल
वाहनात इंधन नसल्याचे कारण देऊन तपास टाळल्याची घटना समोर येताच राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावरून गृहमंत्रालयाच्या एकूणच कारभारावर आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त केला होता. या दोन्ही वृत्तांची गृहमंत्रालयाकडूनही गंभीर दखल घेतली गेली आणि थेट पोलिस आयुक्तांकडे याबाबत विचारणा करण्यात आली. गृहमंत्रालयाच्या विचारणेनंतर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी तडकाफडकी पावले उचलत निष्काळजी ठाणेदाराला नियंत्रण कक्षाचा रस्ता दाखवला, अशी माहिती आहे.
