भाविकांसाठी आनंदाची बातमी! ‘सिद्धिविनायक मंदिर कॉरिडोर’चा मार्ग मोकळा; दर्शन घेणं सोपं होणार

अनेक दिवसांपासून रखडलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर कॉरिडोरच्या भूमिपूजनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २५ मे रोजी या कॉरिडोरचा शुभारंभ केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे मंदिर परिसरातील वाहतूक, भाविकांची गर्दी आणि सुविधा व्यवस्थापन अधिक सुसूत्र होणार असल्याची माहिती मंदिराचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी  दिली.

कसा होणार विकास?

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः मंगळवार, संकष्टी चतुर्थी तसेच विविध उत्सव काळात मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या पार्श्वभूमीवर भाविकांना अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडोर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरातील रस्त्यांचे सुशोभीकरण, पादचारी मार्ग विकसित करणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारणा, भाविकांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था, भूमिगत पार्किंग तसेच सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची कामे प्रस्तावित आहेत. याशिवाय मंदिर परिसराला आधुनिक स्वरूप देतानाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *