पुणे महापालिकेत बनावट भरती; युवकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा विजय कुंभार यांचा आरोप

पुणे महापालिकेत नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बेरोजगार युवकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या नावाने बनावट भरती प्रक्रिया राबवून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

उमेदवारांकडून नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळण्यात आले. एका विद्यार्थ्याकडून ४५ लाख रुपये घेतल्याचे उघड झाले असून, शिवानंद पाटील, नमिता बनसोडे आणि राजेंद्र खेडेकर यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.

फसवणुकीसाठी नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब केला होता. बनावट नियुक्तीपत्रे, प्रशिक्षण आदेश, वर्कऑर्डर; तसेच पुणे महापालिकेचे बनावट शिक्के आणि लोगो वापरून भरती प्रक्रिया अधिकृत असल्याचे भासवण्यात आले.

पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव वापरून उमेदवारांचा विश्वास संपादन करण्यात आला. काही ठिकाणी पालिकेजवळील हॉटेलमध्ये मुलाखती आयोजित करून प्रक्रिया खरी असल्याचा आभास निर्माण केला. बनावट कर्मचारी दाखवून त्यांच्या नावाने खोट्या वेतन पावत्या तयार केल्याचेही समोर आले आहे.

या रॅकेटमध्ये पालिकेतील काही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संपूर्ण साखळी उघड करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

आयुक्तांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे नियुक्तीपत्र
महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांनी १५ लाख ४१ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार नाना पेठेतील एका तरुणाने केली आहे. या तिघांनी चक्क महापालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचे आणि शिक्क्यांचे नियुक्तीपत्र दिल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या तरुणाने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत पोलिस आयुक्त कार्यालयाकडे लेखी तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *