यंदाच्या खरीपावर ‘एल निनो’चं संकट! राज्यात सरासरी 88 टक्के पावसाचा अंदाज, प्रभाव कधीपासून दिसणार?

यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोचे मोठे सावट आहे. त्यामुळे राज्यात सरासरी ८८ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपुऱ्या पावसाचा फटका बसू शकतो. याशिवाय, मध्य पूर्वेतील युद्धामुळे रासायनिक खतांचा तुटवडा होऊ शकतो’, अशी शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केली.

यंदाच्या खरीप हंगामात कमी पाऊस आणि खत व्यवस्थापन ही दोन मोठी आव्हाने असतील. मात्र प्रशासन, कृषी विद्यापीठे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने या संकटांना सामोरे जाण्यासाठी सरकार सज्ज असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामात १५२ लाख हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ८८ टक्के राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. जूननंतर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचे प्रमाण क्रमाक्रमाने कमी होत जाण्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, दोन पावसाच्या दरम्यान मोठे अंतर राहू शकते. त्यामुळे पिकांवर ताण येऊ शकतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन जलयुक्त शिवारची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत’, असे फडणवीस म्हणाले.

‘महाविस्तार २.०’ ॲपचे अनावरण
या बैठकीत कृषी विभागाच्या ‘महाविस्तार २.०’ या ॲपचे अनावरण करण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत हवामान, पीक व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारभाव याविषयी माहिती मिळणार आहे. एआय आधारित कॉलिंग सुविधेद्वारे शेतकरी थेट संवाद साधू शकणार आहेत.

खतांची साठेबाजी रोखणार
‘सध्या राज्यात खतांचा सुमारे २५ टक्के जुना साठा उपलब्ध असून, नवीन साठाही येणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खतांचा ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खतांचा चुकीचा वापर, साठेबाजी आणि फेरफार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. खतांचा वापर औद्योगिक कारणांसाठी होणार नाही, यासाठी आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक रेक पॉइंटवर जीआयएस मॅपिंग आणि व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. खत उतरवताना कृषी विभागाचा कर्मचारी उपस्थित राहील आणि संपूर्ण साखळीवर देखरेख ठेवेल’, अशी माहिती फडणवीस यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *