विदर्भ सध्या भीषण उष्णतेच्या तडाख्यात सापडला असून तापमानाने अक्षरशः कहर माजवला आहे. वर्धा येथे बुधवारी तब्बल ४७.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली असून महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून वर्ध्याची नोंद झाली आहे. उपराजधानी नागपुरातही पारा ४६.६ अंशांवर पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच सूर्य आग ओकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पसरत असून नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. उष्ण वाऱ्यांमुळे वातावरण अधिकच तापले असून शहरातील बाजारपेठा, चौक आणि मुख्य मार्गांवर दुपारच्या सुमारास कर्फ्यूसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार
- अकोला – ४५.२ डिग्री
- अमरावती – ४६.४ डिग्री
- भंडारा – ४४.६ डिग्री
- बुलढाणा – ४१.० डिग्री
- चंद्रपुर – ४६.२ डिग्री
- गढ़चिरौली – ४५.६ डिग्री
- गोंदिया – ४४.९ डिग्री
- नागपुर – ४४.६ डिग्री
- वर्धा – ४७.१ डिग्री
- वाशिम – ४२.६ डिग्री
- यवतमाल – ४५.२ डिग्री
दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवरही दिसून येत आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, उलट्या, अशक्तपणा आणि थकवा अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उन्हात काम करणारे मजूर यांना सर्वाधिक फटका बसत आहे. डॉक्टरांकडून नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जात आहे.
हवामान विभागाने पुढील आठवडाभर विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचे, हलके व सैल कपडे वापरण्याचे आणि उष्णतेपासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
