शाळेत ज्याप्रमाणे निबंधांसाठी विषय दिले जायचे तशीच आता ‘इंटरनेट शाप की वरदान’ यावर चर्चा करण्यासारखी स्थिती आहे. इंटरनेट आणि त्यातही मोबाईल इंटरनेटमुळे आयुष्य सहज सोपं झालेलं असतानाच याच माध्यमातून फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीचं प्रमाणही वाढलं आहे. त्यात हे फसवणूक करणारे सायबर चोर नेहमी काहीतरी नवी गोष्टींच्या माध्यमातून लोकांना गडवतात. अशाच दोन विचित्र घटना मुंबईत समोर आल्या आहेत. सायबर गुन्ह्यातील आर्थिक फसवणुकीसाठी थेट हनी ट्रॅपचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
आर्थिक राजधानीचं शहर असलेल्या मुंबईमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांपैकी पहिल्या घटनेत सांताक्रूझ येथील 78 वर्षीय वृद्धाला अनोळखी महिलेने सोन्यात गुंतवणूक करून चांगली कमाई करीत असल्याचे भासवून साडेतीन लाखांना गंडविलं आहे. तर अन्य एका अशाच फसवणुकीच्या घटनेमध्ये भायखळा येथील इंटिरिअर डिझायनरला डेटिंग अॅपवरून एका तरुणीशी झालेली ओळख 21 लाख रुपयांना पडली आहे. या तरुणी आपल्या मधाळ बोलण्याने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने 21 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आलाय. नेमकं या दोघांसोबत घडलं काय जाणून घेऊयात..
वृद्धाला घातला गंडा
पहिल्या प्रकरणामध्ये मुलीसोबत सांताक्रूझ येथे राहणाऱ्या 78 वर्षीय वृद्धाला मनीषा शर्मा नावाच्या महिलेचा मेसेज आला. अनोळखी महिलेने मेसेज पाठविला म्हणून वृद्धाने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क केला. त्यावेळी तिने विधवा असल्याचे सांगत इव्हेंट कंपनीत काम करीत असल्याची माहिती दिली. ‘सोन्यामध्ये गुंतवणूक करून मी चांगली कमाई केली आहे, तुम्हीदेखील पैसे गुंतवू शकता’, असे म्हणत तिने वृद्धाला आपल्या जाळ्यात ओढले.
78 वर्षीय व्यक्तीला म्हणाली, तुमच्यासोबत लग्न करायचंय
मनीषा हिच्या सांगण्यावरून वृद्धाने थोडे थोडे करून साडेतीन लाख रुपये गुंतवले. यानंतरही मनीषा आणखी दोन लाख रुपये मागू लागली. वृद्धाने नकार देताच मनीषा हिने तुमच्याबरोबर लग्न करायचे आहे, असे म्हटले. वृद्धाने तो प्रस्तावही फेटाळून लावला. त्यावर ‘मला जर दहा लाख रुपये दिले नाही तर मी खोटी केस करेन. आत्महत्या करून त्यात तुमचे नाव लिहून ठेवेन’, अशी धमकी मनीषा देऊ लागली. प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून वृद्धाने सांताक्रूझ पोलिस ठाणे गाठत याबाबत तक्रार केली.
मधाळ बोलण्यात तरुण फसला
असाच दुसरा प्रकार भायखळा येथे घडला. येथील एका इव्हेंट मॅनेजरची डेटिंग अॅपवर अनन्या शर्मा नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. चॅटिंग करता करता दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आपण शेअर बाजारात अनेकांचे पैसे गुंतवले असून त्यातून त्यांना नफा मिळवून देत असल्याचे अनन्या हिने या तरुणाला सांगितले. तिच्या मधाळ बोलण्याने हा तरुण फसला आणि गुंतवणूक करण्यास तयार झाला. तिने दिलेल्या लिंकवर जाऊन तरुणाने आपले प्रोफाइल तयार केले.
21 लाखांचे 66 लाख दिसले अन्…
गुंतवणूक करीत असलेल्या रकमेवर होणारा नफा वॉलेटमध्ये दिसत होता. 21 लाखांपेक्षा अधिक रक्कम गुंतवल्यानंतर तरुणाच्या वॉलेटमध्ये 66 लाख रुपये जमा झाल्याचे दिसत होते. ही रक्कम तरुणाने काढण्याचा प्रयत्न केला असता तो अयशस्वी झाला. आधी 33 टक्के कर भरावा लागेल, त्यानंतरच ही रक्कम काढता येईल, असे अनन्या हिने सांगितले. त्यावरून तरुणाला संशय आला आणि त्याने इतरांकडे चौकशी केली असता ही सायबर फसवणूक असल्याचे लक्षात आले.
सावधान राहणं गरजेचं
ऑनलाइन माध्यमातून आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार वेळोवेळी घडत असतात. यासंदर्भात पोलिसांकडूनही जनजागृती मोहिम चालवली जाते. कोणीही 10 ते 12 टक्क्यांहून अधिक परतावा देईल असं म्हटलं तर अशा ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी सर्व माहिती गोळा केल्यानंतरच आर्थिक व्यवहार करणं शहापणाचं ठरतं. बऱ्याचदा मोठा आर्थिक नफ्याचं आमिष दाखवून बँक खात्यांवर डल्ला मारला जातो. हल्ली अनेकांची बँक खाती युपीआयशी कनेक्टेड असल्याने लिंकच्या माध्यमातूनच थेट हा पैसा इतर खात्यांवर वळवल्याचे प्रकार अनेकदा घडतात. म्हणूनच अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे.
