शेकरु अन् स्टार कासवाच्या तस्करीचा पर्दाफाश; पुणे रेल्वे स्थानक परिसरात DRIची कारवाई, दोन आरोपी ताब्यात

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटलिजन्स) पुण्यात केलेल्या एका कारवाईत महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेले शेकरू आणि दुर्मीळ इंडियन स्टार टॉरटॉइज या कासवांची तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे रेल्वे स्थानक परिसरात वन्यजीवांची बेकायदा विक्री आणि तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) मिळाली होती. पुण्यातील अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून रेल्वे स्थानक परिसरातील एका निश्चित केलेल्या ठिकाणी पाळत ठेवली. या वेळी पहिल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील सामानाची झडती घेतली असता, दोन खोक्यांमध्ये तीन जिवंत शेकरू लपवून ठेवल्याचे दिसले. अधिक चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे, शोध पथकाने पुण्यातच दुसऱ्या एका ठिकाणी तातडीने धाड टाकली. तेथून दुसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सात जिवंत कासवे जप्त करण्यात आली.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही प्राण्यांचा केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित श्रेणी (शेड्यूल वन) श्रेणीत समावेश होतो. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून, त्याचा व्यापार आणि शिकारींवर कायद्याने पूर्ण बंदी आहे. स्टार कासवाला कायद्याने विशेष संरक्षण दिले असून, ते बाळगणे, वाहतूक करणे किंवा व्यापार करणे हा गंभीर गुन्हा आहे. तरीदेखील आरोपीने या दोन्ही प्राण्यांना विक्रीसाठी पुण्यात आणले होते. त्यामुळे शोध पथकाने वन्यजीव, दोन्ही आरोपी आणि तस्करीसाठी वापरलेले साहित्य पुढील कायदेशीर कारवाईसाठी पुणे वन विभागाकडे सुपूर्द केले आहेत. बावधन येथील वन्यजीव उपचार केंद्रामध्ये सध्या या प्राण्यांना ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक विशाल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर पाटील यांच्यासह अधिकारी, कर्माचारी करित आहेत.

‘वन्यप्राण्यांची खरेदी करू नका’
प्राणी-पक्ष्यांची विक्री करणाऱ्या (पेटशॉप) चालकांकडून सांगितल्या जाणाऱ्या खोट्या माहितीला बळी पडू नका. अनेकदा हे व्यावसायिक कायद्याची माहिती लपवून बंदी असलेले प्राणी किंवा पक्ष्यांची विक्री करतात. वन्यजीव (संरक्षण) कायद्याअंतर्गत भारतीय; तसेच काही परदेशी (एक्झॉटीक) वन्यजीवांची खरेदी-विक्री आणि ते घरात पाळणे हा गंभीर व अजामीनपात्र गुन्हा आहे. वन्यजीवांची बेकायदा विक्री किंवा तस्करी आढळल्यास वन विभागाच्या १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा, असे आवाहन सहायक वनसंरक्षख विशाल चव्हाण यांनी केले.

आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी त्यांना कोर्टात हजर केले होते. दोघांना तीन दिवसांची वन कोठडी मिळाली आहे. पुढील तपास सुरू आहे. –विशाल चव्हाण, सहायक वनसंरक्षक, पुणे वन विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *