17 पैकी 7 जागा द्या, शिंदेंची ठाण्याचीही मागणी; सुनेत्रा पवारांना हव्या पुण्यासह तीन जागा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडून दिल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना, दुसरीकडे जागावाटपाच्या सूत्रावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे समजते. शिवसेनेने सात जागांची, तर राष्ट्रवादीने तीन जागांची मागणी भाजपकडे केल्याचे समजते. त्यातही भाजपचे संख्याबळ अधिक असलेल्या जागांवर मित्रपक्षांनी दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. ठाणे आणि पुणे हा मुद्दा कळीचा मुद्दा ठरत असल्याचे समजते.

विधान निवडणूक परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. संख्याबळानुसार महायुतीचे पारडे जड असले, तरी कोणी किती जागा वाटून घ्यायच्या यावरून महायुतीमध्ये खल सुरू असल्याचे समजते.

शिंदेंची सात, राष्ट्रवादीची तीन जागांची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपकडे सात जागांची, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने तीन जागांची मागणी केली आहे. एकूण १७ पैकी १० जागांवर मित्रपक्षांनी दावा केल्याने महायुतीमध्ये मोठा भाऊ असलेल्या भाजपकडे अवघ्या सात जागा उरत असल्याने पेच निर्माण झाला आहे.

ठाणे आणि पुणे कळीचा मुद्दा

विशेष म्हणजे, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवताना ठाणे आणि पुणे हा कळीचा मुद्दा ठरत असल्याचे समजते. या दोन्ही ठिकाणी भाजपचे संख्याबळ चांगले असले, तरी येथे मित्रपक्षांनी दावा ठोकला आहे. ठाण्याची जागा एकनाथ शिंदे यांना पाहिजे असली, तरी तिथे भाजपचे संख्याबळ जास्त आहे. पुण्याची जागा सुनेत्रा पवार यांना हवी असून तिथेही भाजपचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे आता ठाणे आणि पुणे यांवर भाजप पाणी सोडणार का, यावर खल सुरू आहे. ठाणे आणि पुणे या जागा सोडल्या, तर त्या बदल्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जास्तीच्या जागा पदरात पाडून घेणार असल्याचे बोलले जात आहे.

महायुतीत अंतर्गत वादाची चिन्हं

राज्यातील अन्य काही जागांवरही महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरची जागा सोडणार नसल्याचा दावा शिवसेना नेते, मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या जागेसाठी तिन्ही पक्ष आग्रही असून या जागावर तडजोड झाली नाही, तर महायुतीत अंतर्गत वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. साहजिकच महायुतीत दिलजमाई झाली नाही, तर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याचेही सांगितले जाते.

गाठीभेटींना वेग

शिवसेनेच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली होती. बुधवारी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांच्यातही एक बैठक झाली. या बैठकीत जागावाटपाबाबत तोडगा काढण्यावर चर्चा झाल्याचेही समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *