गावदेवी मार्केट आगीत पित्याचा करुण अंत

ठाण्यातील नौपाडा भागातील गोखले रोडवरील गावदेवी भाजी मार्केट इमारतीला गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती. आग शमवण्यासाठी दाखल झालेल्या अग्निशमन दलातील ४२ वर्षीय केंद्र अधिकारी सागर शिंदे आणि प्रभाग समिती कार्यालयामध्ये कार्यरत ५५ वर्षीय सुरक्षारक्षक काळू गाडेकर यांचा या आगीत मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सागर शिंदे यांना दोन महिन्यांपूर्वीच कन्यारत्नाचा लाभ झाला होता. मात्र शिंदे यांच्या निधनानंतर या मुलीच्या डोक्यावरील पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दोन महिन्यांच्या लेकीचं पितृछत्र हरपलं

ठाण्यातील बाळकुम हायलॅण्ड येथील गृहसंकुलामध्ये शिंदे कुटुंब राहत होते. शिंदे पाचपाखाडी येथील केंद्रामध्ये कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाला. शिंदे यांच्या पश्चात आई जयश्री, पत्नी माधुरी व दोन महिन्यांची मुलगी असा परिवार आहे. शिंदे यांचे पार्थिव नितीन कंपनी येथील अग्निशमन केंद्रात आणण्यात आले. इथे लोकप्रतिनिधी, अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली.

महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार जितेंद्र आव्हाड, माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली. यावेळी शिंदे यांची आई आणि पत्नीचे महापौरांकडून सांत्वन करण्यात आले. अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीदेखील शिंदे यांना मानवंदना दिली.

गाडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार

काळू शंकर गाडेकर यांचे पार्थिव शवविच्छेदनानंतर त्यांचे मूळ गावी गाडेकरवाडी, गंगापूर, आंबेगाव, जिल्हा पुणे येथे नेण्यात आले. गाडेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

दुर्लक्ष केल्यामुळेच दुर्घटना

अतिक्रमणे, मार्केटमधील बेकायदा फेरीवाल्यांचा प्रवेशद्वारावर कब्जा, स्थावर मालमत्ता विभागाच्या संगनमताने मार्केटभोवती उभारलेल्या बेकायदा टपऱ्यांमुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी केला. या आगीची माहिती मिळताच वाघुले यांनी अग्निशमन दलाबरोबर संपर्क साधला होता.

फळे व भाजीपाला विक्रीसाठी असलेल्या या मार्केटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. काही समाजकंटकांकडून दहशतही पसरवली जात होती. प्रवेशद्वाराचा कब्जा बेकायदा फेरीवाल्यांनी घेतला होता. मार्केटच्या दोन बाजूंच्या भिंतीभोवती बेकायदा टपऱ्या टाकल्या गेल्या. या प्रकाराविरोधात सातत्याने महापालिका व स्थावर मालमत्ता विभागाचे लक्ष वेधण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आगीची दुर्घटना घडली, असा आरोप वाघुले यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *