राज्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात एका वाघाच्या हल्ल्याने थरकाप उडाला आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर एकाचवेळी या वाघाने जीवघेणा हल्ला केला. यात चार महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आज शुक्रवारी सकाळी समोर आली आहे. महिला तेंदूपत्ता तोडण्याचं काम करत असतानाच अचानक वाघा आला. महिलांनी वाचण्याचे प्रयत्न केले. पण, चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 13 महिला सिंदेवाहीमधील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी सोबत गेल्या होत्या. तेंदूपत्ता तोडण्याचं त्यांचं काम सुरू असतानाच या महिलांवर वाघाने अचानक हल्ला चढवला. अचानक झालेल्या वाघाच्या हल्ल्यामुळे त्या महिला घाबरल्या आणि सैरावैरा पळत सुटल्या. पण, वाघाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला अन् या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे. कवडूबाई दादाजी मोहुर्ले (वय 45), अनुबाई दादाजी मोहुर्ले (वय 46), संगीता संतोष चौधरी (वय 36) आणि सुनीता कौशिक मोहुर्ले (33) अशी मृतकांची नावे आहेत.
महिला ओरडत गावात अन्…
तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या 13 महिलांपैकी एक महिला भीतीने घटनास्थळावरुन ओरडत गावात आली. तिने आरडाओरड करत गावकऱ्यांना गोळा केलं आणि वाघाच्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे चार महिलांची बॉडी आढळून आली. तर इतर महिलाही सुखरूप असल्याची माहिती आहे. वनविभाग या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
