मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा टोलनाका सुरू झाल्यानंतर, रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ आणि एमएच-४६ पासिंगच्या वाहनांना टोलमाफी दिल्याबाबत मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात टोलनाक्यावर या वाहनांकडून सर्रास टोल वसूल केला जात आहे. त्यामुळे रायगडकरांची दिशाभूल झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही मौन बाळगल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
टोलविरुद्ध आक्रमक भूमिका
खारपाडा टोलनाका शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आला. स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी या टोलविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या आंदोलनानंतर रायगड जिल्ह्यातील एमएच-०६ नोंदणीकृत वाहनांना टोलमाफी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र हा दिलासा अल्पायुषी ठरला.
प्रत्यक्षात टोलनाक्याच्या व्यवस्थापनाने स्पष्टीकरण देत, ही सवलत रायगडमधील सर्व वाहनांना नसून केवळ पेण आणि पनवेल शहर परिसरापुरती मर्यादित असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ‘रायगडकरांना टोलमाफी’ ही घोषणा केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठीच होती का, असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत.
अनेक कामं रखडली
गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्याचे काम तब्बल १६ वर्षांपासून रखडलेले आहे. अनेक ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत. ड्रेनेज व्यवस्था नाही, उड्डाणपुलांची कामेदेखील रखडली आहेत. रामवाडी येथील वाशी नाका परिसरात वडखळकडे जाणारा मार्ग बंद असल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील वाहतूककोंडीमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
महामार्गाच्या कामात इतक्या गंभीर त्रुटी असतानाही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुली सुरू केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, महामार्गावरील फलकदेखील हिंदी भाषेत असल्याने स्थानिकांच्या भावनांचा अपमान होत असल्याची टीका होत आहे.
लोकप्रतिनिधींचे मौन
रायगडकरांची उघड लूट सुरू असताना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. निवडणुकांच्या वेळी जनतेसमोर मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आता टोलच्या प्रश्नावर गायब झाल्याची भावना आहे. रायगडसह संपूर्ण कोकणातील नागरिकांची होणारी आर्थिक लूट तातडीने थांबवून खारपाडा टोल बंद करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
