सर्वात मोठी बातमी! राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; 18 वर्षानंतर कोर्टाने दिला निकाल

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 2008 रेल्वे भरती आंदोलन प्रकरणामध्ये निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. रेल्वे भरतीच्या वेळी मनसेनं केलेल्या आंदोलन प्रकरणी राज ठाकरेंनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी मागील अनेक वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणात आज राज यांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.

…म्हणून निर्दोष मुक्तता करण्यात आली

राज ठाकरेसह या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांआभावी सर्वांची मुक्तता करण्यात आल्याची माहिती वकिलांनी कोर्टाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सरकारी पक्षाने गुन्हा सिध्द होईल आणि आरोपींचा सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे मांडले नसल्याचा निर्वाळा ठाणे सत्र न्यायालयाने केला. या निकालासहीतच राज ठाकरे यांना कथित चिथावणी दिल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आलं.

नेमकं घडलेलं काय?

19 ऑक्टोबर 2008 रोजी कल्याण रेल्वे स्टेशनबरोबरच आणि दादर, अंधेरी, डोंबिवली इत्यादी रेल्वे स्थानकांवर रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय मुख्यतः बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेकडो उमेदवारांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. परीक्षेसाठी दुसऱ्या राज्यातून आलेल्यांना मारहाण करण्याबरोबरच मनसैनिकांनी परीक्षा पेपर फाडले होते. तसेच रेल्वे स्थानकावर दगडफेक, तोडफोड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्याचप्रमाणे काही उमेदवारांना मनसैनिकांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरून पळवून लावलं होतं. रेल्वेच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.

राज ठाकरेंशी काय संबंध?

हा सारा प्रकार घडण्याच्या काही दिवस आधीच राज ठाकरे यांनी रेल्वे नोकर भरतीत ‘बिहारी तरुणांना प्राधान्य’ दिल्याचा आरोप करत विरोध केला होता. त्यांच्या भाषणामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ‘मराठी तरुणांना हक्क मिळावा’ असं म्हणत आंदोलन केलं होतं, असा ठपका ठेवण्यात आलेला. प्रक्षोभक भाषणाच्या माध्यमातून राज यांनी तरुणांची माथी भडकवल्याचा आणि त्यामधूनच हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

राज ठाकरेंवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आलेले?

प्रत्यक्ष हल्ला झाला तेव्हा राज ठाकरेंनी आपण तिथे उपस्थित नव्हतो तसेच याबद्दल आपल्याला काहीही कल्पना नव्हती असं ठाणे सत्र न्यायालयाला सांगितलं. राज ठाकरेंविरुद्ध आयपीसी कलम 153 (दंगा भडकवणे), 153 A (समूहांमध्ये वैमनस्य वाढवणे), दंगल, मारहाण, सार्वजनिक मालमत्ता नुकसान इत्यादी कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेले. बिहार-झारखंडमध्येही राज ठाकरेंविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

कोर्टात राज काय म्हणाले?

20 ऑक्टोबर 2008 रोजी राज ठाकरे यांना रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. केस सुरुवातीला कल्याण कोर्टात होती, नंतर ठाणे कोर्टात हस्तांतरित करण्यात आली. 13 ते 18 मे 2026 रोजी ठाणे कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे हजर होते. त्यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळताना “मी घटनास्थळी नव्हतो, हे खोटे गुन्हे आहेत, मी दोषी नाही” असं सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *