केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1,235 रुपये म्हणजेच 12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा दर अत्यंत तोकडा आणि अपुरा असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र शब्दांत टीका केली.
3 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी
किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत ‘नाफेड’ आणि ‘राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ’ या केंद्रीय यंत्रणांमार्फत ही कांदा खरेदी केली जाणार आहे. बफर स्टॉक (राखीव साठा) तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी ही प्रक्रिया राबवली जाते. मात्र, शेतकरी संघटनांनी कांद्याला प्रतिक्विंटल किमान 3 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी केली आहे. यासोबतच, गेल्या काही महिन्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी भावात कांदा विकावा लागला, त्यांना प्रतिक्विंटल 1,500 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात कांदा खरेदीच्या दराची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले की, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील घसरलेले भाव यांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. हा उपाय शेतकऱ्यांना दिलासा देणारा नसून त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.
कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या हिताची नाही
केंद्र सरकारने महाराष्ट्रात प्रतिकिलो 12 रुपये 35 पैसे दराने कांदा खरेदी सुरु केली असली, तरी ही शेतकरी हिताची नसल्याची टीका मुंबई व लासलगाव बाजार समितीचे सदस्य जयदत्त होळकर यांनी केली. होळकर म्हणाले की, ‘नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या ‘ग्रेड-ए’ दर्जाचा कांदा प्रतिकिओल 13 ते 14 रुपये दराने विकला जात असून सर्वसाधारण दर्जाच्या कांद्यालाही 10 ते 12 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे 12 रुपये 35 पैसे दराने होणारी सरकारी खरेदी शेतकऱ्यांसाठी फायदेशील कशी?’ दरम्यान, ‘नाफेड’ आणि ‘एनसीसीएफ’नी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याऐवजी थेट बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांप्रमाणे खरेदी करावी. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल’, असेही ते शेवटी म्हणाले.
लासलगाव समितीत उद्या आंदोलन
कांद्याच्या घसरलेल्या बाजारभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत सोमवार, दि. १८ मे रोजी लासलगाव बाजार समितीत होणाऱ्या कांदा आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी खासदार भास्कर भगरे यांनी बाजार समितीस भेट दिली. उपसभापती संदीप (ललित) दरेकर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू असून, हंगामाच्या सुरुवातीलाच कांद्याला अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आमदार रोहित पवार हे १८ मे रोजी लासलगाव बाजार समितीत आंदोलन करणार आहेत, असेही त्यांनी योवळी सांगितले.
