ठाणे पालिकेत सत्तेत एकत्र बसलेल्या शिवसेना-भाजप नगरसेवकांच्या महासभेतील वादानंतर सुरु झालेली आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. भाजपने शिवसेना नगरसेवकांच्या आक्षेपार्ह वर्तनाप्रकरणी निलंबनाची मागणी केली आहे. याआधी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नगरसेवकानेही भाजप नगरसेवकांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे केली होती. या वादामध्ये विरोधकांनी उडी घेतली असून या दोन्ही सत्ताधारी पक्षातील वाद हा ‘दिखाव्याची सर्कस’ असल्याचा टोला राष्ट्रवादीने (शप) मारला आहे. तसेच शिवसेनेने (उबाठा) या वादावर टीकास्त्र सोडले असून या पार्श्वभूमीवर सोमवारी ठाणे पालिकेसमोर काँग्रेसने निषेध आंदोलन केले. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला आहे. दुसरीकडे या वादावर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे.
शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांमधील वादाच्या दुसऱ्या अंकानंतर सोमवारी शिवसेनेच्या वतीने सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधत शहराच्या विकासाच्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित काम करावे, अशी भूमिका मांडली. सभागृहात शिवसेनेच्या विरुद्ध घोषणा देणाऱ्या भाजप नगरसेवकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ अन्व्ये निलंबन करावे, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्याकडे पत्राद्वारे केली.
दुसरीकडे पालिकेच्या पहिल्या महासभेपासून प्रत्येक महासभेचे ऑनलाईन प्रक्षेपण सुरू करण्याच्या मागणीसाठी भाजप आग्रही आहे. मात्र, त्याबाबत महापौरांसह शिवसेनेने अजून निर्णय जाहीर केला नाही. शुक्रवारच्या महासभेत ऑनलाईन प्रक्षेपण सुरू असते, तर ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ फैसला झाला असता, असे भाजपच्या ठाणे पालिका गटनेते मुकेश मोकाशी यांनी सांगितले. महासभेमध्ये भाजपचे नव्हे तर शिवसेनेच्या नगरसेवकांचे वर्तन आक्षेपार्ह असल्यामुळे त्यांना निलंबित करावे, असे प्रत्त्युत्तर मोकाशी यांनी दिले.
भाजपने सत्तेबाहेर पडून विरोध करावा’
“शिवसेना-भाजपने निवडणूक एकत्र लढविली आहे. आता ते सत्तेत एकत्र आहेत. तरीही, ज्या पद्धतीने शिवसेनेला विरोध करण्याची भूमिका घेत आहेत; ते पाहता, भाजपकडून सर्कस सुरू करण्यात आलेली आहे. सत्तेत सहभागी होऊन सत्तेलाच आव्हान देण्याची भाजपची कृती कशासाठी आहे, न समजायला जनता दुधखुळी नाही. विरोधक म्हणून आम्ही विषयपत्रिकेवर अभ्यास करून सभागृहात बसत असतो. मात्र, भाजपचे नगरसेवक नाहक वाद निर्माण करून सभागृहाचे कामकाज उधळवून लावत आहेत. त्यांना विरोध करायचाच असेल तर सत्तेबाहेर येऊन आमच्या नेतृत्वाखाली विरोध करावा”, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी भाजप नगरसेवकांनाही दिले.
दरम्यान, याप्रश्नी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी आंदोलन केले. शिवसेनेचे (उबाठा) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी महासभेचे कामकाज लाईव्ह कॅमेऱ्यासमोर करण्याची मागणी केली असून टक्केवारीच्या वादातून असे प्रकार होत असल्याचे दिघे यांनी सांगितले.
‘युती म्हणून आम्ही एकत्र’, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप नगरसेवकांची बैठक घेऊन विषय मार्गी लावले जाणार आहेत. काही बाबींवर छोट्या मोठ्या कुरबुरी असतील, तर त्या दूर केल्या जातील, युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली.
ठाणे पालिकेतील शिवसेनेच्या नूतनीकृत पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वादाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान, या सोहळ्याला उपमहापौर कृष्णा पाटील आणि भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी यांनी हजेरी लावत शिंदे यांचे स्वागत केले. त्यामुळे भविष्यात या वादावर वरिष्ठ पातळीवर पडदा पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
