कमरेला प्लास्टिकची बाटली बांधून तलावात, नामांकित भूलतज्ज्ञ डॉ.अभिमन्यू तरकसेंचा स्विमिंग करताना मृत्यू; घातपाताचा संशय

बीड जिल्ह्याच्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अभिमन्यू तरकसे यांचा आज सकाळी काळवीट साठवण तलावात पोहताना बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे डॉ.तरकसे हे साठवण तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, आज पहाटे 6:30 च्या सुमारास ते तलावात बुडाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली आणि सहकाऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. या घटनेनं संपूर्ण अंबेजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. तरकसे यांच्या जाण्यानं सर्वांना एकच धक्का बसला असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मयत डॉ.अभिमन्यू तरकसे यांची बॉडी शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आली. डॉ. तरकसे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडलं? यासह अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. मात्र, या सर्व निर्माण झालेल्या प्रश्नांचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. एका अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्यानं अंबेजोगाई शहरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

कमरेला पाण्याची बाटली बांधली

डॉ.अभिमन्यू तरकसे हे आरोग्याबाबत खूप जागरुक होते. ते स्वतःची प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून न चुकता अंबेजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला पाण्याची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला अचानकपणे एक बॉडी तरंगताना असल्याचं पोहणाऱ्या
काही लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता, ती बॉडी डॉ. तरकसे यांचीच असल्याचं स्पष्ट झालं.

डॉ.अभिमन्यू तरकसे हे मुळचे अंबेजोगाई तालुक्यातील धावडी गावचे रहिवासी होते. डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीत झालं होतं. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली आणि पुढे याच महाविद्यालयातून त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर याच संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉ.तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांची लोकप्रियता खूप जास्त होती, असं देखील नागरिकांनी सांगितलं. त्यांचा याच परिसरातील तलावात दुर्दैवी अंत झाल्यानं परिसरात आणि वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *