पेट्रोल, डिझेल अन् दुधानंतर मुंबईकरांचा नाश्ता महागणार; दिवसेंदिवस सर्वसामन्यांचे जगणं अवघड

दुधाच्या दरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर, मुंबईकरांना आता महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. मागील काही महिन्यांपासून महागाईची सतत वाढताना दिसत आहे. महागाईमुळे आता मुंबईकरांचे जगणं अवघड झाले आहे. पेट्रोल, डिझेल आणि दूध यांच्या किमतीत वाढ झाली होती. यानंतर आता आणखी एक धक्का बसला आहे. मुंबईकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

मुंबईत पावाच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. 14 मे रोजी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ केली. यानंतर काही दिवसानंतर गोकुळ दुधाच्या किमतीतही वाढ झाली. आता पाव आणि ब्रेडच्या दरात 5 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या, विशेषतः वडा पाव, मिसळ पाव, भाजी पाव आणि सँडविच यांसारख्या स्वस्त पदार्थांवर अवलंबून असलेल्या नोकरदार वर्गाच्या दैनंदिन खर्चावर होण्याची शक्यता आहे.

बेकऱ्यांनी दर का वाढवले?

मुंबईतील स्थानिक बेकऱ्यांनी ब्रेड तसेच सिंगल पावाच्या किमती वाढवल्या आहेत. वाढत्या उत्पादन खर्चामुळे आपल्याला दर वाढवण्यास भाग पडले आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. प्लास्टिक पॅकेजिंग, वाहतूक, आयात केलेला कच्चा माल आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे खर्च पूर्वीपेक्षा जास्त होत आहे.

ही चिंतेची बाब आहे, कारण वडा पाव हा मुंबईच्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे. येथे दररोज लाखो लोक पावापासून बनवलेले पदार्थ खातात. ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे की, या ताज्या दरवाढीमुळे आधीच वाढत्या महागाईशी झगडणाऱ्या सामान्य मुंबईकरांवर आणखी भार पडेल.

सर्वत्र वाढणारी महागाई

1 मे रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ₹993 ने वाढ करण्यात आली. याशिवाय, गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोनदा वाढ झाली आहे. यामुळे बेकरींना कच्चा माल पोहोचवण्याचा आणि दुकानांना पाव व ब्रेड पुरवण्याचा खर्च वाढला आहे. त्यामुळे, होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे असल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *