उड्डाणपुलाची रखडपट्टी; ऐरोली-काटई नाका मार्गाचे भूसंपादन अपूर्ण, डोंबिवली-नवी मुंबई वाहतूककोंडी कायम राहणार?

मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने ऐरोली ते काटई नाका (एनएच ४) उड्डाणपुलाच्या कामाच्या तिसऱ्या टप्प्याचे कंत्राट ऑक्टोबर २०२४ मध्ये दिल्यानंतर दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकल्पाचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असली, तरी ती पूर्ण होण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. परिणामी ऐरोली-काटई उड्डाणपूल प्रकल्पाची रखडपट्टी झाली आहे. प्रत्यक्ष प्रकल्पाच्या कामाची २०२८ पर्यंतची डेडलाइन एका वर्षाने लांबण्याची शक्यता आहे.

प्रवास अवघ्या 10 मिनिटांत

नवी मुंबईतील रबाळे, ऐरोली परिसरातून वाहनचालकांना कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी प्रामुख्याने शीळफाटा-महापे मार्गाने वळण घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतून बदलापूच्या दिशेने प्रवास करताना होणारा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी ऐरोली-काटई नाका उन्नत आणि भूमीगत अशा दोन्ही पद्धतीने सहापदरी रस्त्याची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून केली जात आहे. शिळफाट्यावरील वाहतूककोंडी दूर करून ऐरोली ते काटईपर्यंतचा प्रवास अवघ्या १० मिनिटांमध्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर येथील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *