ट्रम्प चीनमध्ये असताना अमेरिकेवर संकट; गॅस स्टेशन सिस्टिम हॅक, देशाला हादरवण्याचा कट

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर असताना सायबर हल्ल्यांमुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. इराणशी संबंधित हॅकर्सनी अनेक राज्यांमधील गॅस स्टेशन्सवर वापरल्या जाणाऱ्या ऑटोमॅटिक टँक गेज म्हणजेच एटीजी सिस्टिममध्ये शिरकाव केल्याचा संशय अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. गॅस स्टेशन्सवरील इंधन टाकीत असलेल्या तेलाचं प्रमाण मॉनिटर करण्याचं काम एटीजी यंत्रणा करते.

अनेक एटीजी सिस्टिम कोणत्याही पासवर्ड सुरक्षेशिवाय इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या होत्या. याचाच फायदा हॅकर्सनी घेतला आणि यंत्रणेत शिरकाव केला. सीएनएनच्या सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी काही जागांवर टाक्यांच्या स्क्रिनवर दाखवल्या जाणाऱ्या रीडिंग डेटासोबत छेडछाड केली. पण खऱ्या इंधन पातळीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्याच्या घडीला तरी कोणत्याही प्रकारच्या नुकसानाची किंवा गॅस गळतीची समस्या समोर आलेली नाही.

एखाद्या हॅकरनं एटीजी सिस्टिमवर पूर्ण ताबा मिळवल्यास, तो गॅस गळतीसारखी धोकादायक परिस्थिती लपवू शकतो, असा धोका अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि सायबर तज्ज्ञांनी बोलून दाखवला. इराणी सायबर गटांनी याआधीही अमेरिकेतली तेल, वायू आणि पाणी यांच्याशी संबंधित यंत्रणेला लक्ष्य केलं. त्यामुळे यावेळीही अमेरिकेच्या यंत्रणांना इराणवरच संशय आहे.फेब्रुवारीच्या अखेरपासून अमेरिका-इराणमधील तणाव वाढला. अमेरिकेनं इस्रायलच्या साथीनं २८ फेब्रुवारीला इराणवर हवाई हल्ले चढवले. तेव्हापासून मध्य पूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती आहे. तेहरानशी संबंधित हॅकर्सनी अमेरिकेच्या तेल, गॅस केंद्रांसह पाणी पुरवठा व्यवस्थांवर हल्ले केले आहेत. सोबतच वैद्यकीय कंपन्यांनादेखील लक्ष्य केलं आहे. एफबीआयचे संचालक काश पटेल यांचे जुने मेलदेखील लीक करण्यात आले आहेत.

इराणची सायबर क्षमता चीन आणि रशिया यांच्या तुलनेत अतिशय दुबळी असल्याचं आधी मानलं जात होतं. पण गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटना, अमेरिकेच्या यंत्रणांवर होत असलेले सायबर हल्ले पाहता इराणची ताकद दिसली आहे. इराणचे हल्ले अधिकाधिक आक्रमक होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे इराणकडून होत असलेल्या हल्ल्यांचा अंदाज बांधणंदेखील अमेरिकेला अवघड जात आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, आता इराणी हॅकर्सचा गट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बोगस ऑनलाईन ओळखीचा वापर करुन अतिशय वेगानं सायबर हल्ले करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *